झेंडूच्‍या फुलांनी खाल्‍ला भाव! मागणीपेक्षा कमी उपलब्‍धतेमुळे चढ्या दराने विक्री 

अरुण मलाणी
Sunday, 25 October 2020

दसऱ्याला दाराला तोरण, वाहनांना माळ तसेच पूजा विधीसाठी फुलांना विशेष मागणी असते. उत्‍सवाच्‍या पूर्वसंध्येलाच शहरातील रविवार कारंजा, अशोकस्‍तंभ, पंचवटीतील गोदाकाठ परीसर, गाडगे महाराज पूल, द्वारका अशा विविध भागांमध्ये फूलविक्रेत्‍यांची उपस्‍थिती असते.

नाशिक : दसऱ्याच्‍या सणानिमित्त सर्वत्र उत्‍साहाचे वातावरण असतांना, मांगल्‍याचे प्रतिक माणल्‍या जाणार्या तोरण आणि माळांसाठी मात्र नागरिकांना खिसा हलका करावा लागला. मागणीपेक्षा उपलब्‍धता कमी असल्‍याने झेंडूसह अन्‍य विविध फुलांची चढ्या दराने विक्री सुरू होती. दीडशे ते तीनशे रूपये शेकडा तर चारशे ते सहाशे रूपये जाळी या दराने फुलांची विक्री झाली. 

दसऱ्याला दाराला तोरण, वाहनांना माळ तसेच पूजा विधीसाठी फुलांना विशेष मागणी असते. उत्‍सवाच्‍या पूर्वसंध्येलाच शहरातील रविवार कारंजा, अशोकस्‍तंभ, पंचवटीतील गोदाकाठ परीसर, गाडगे महाराज पूल, द्वारका अशा विविध भागांमध्ये फूलविक्रेत्‍यांची उपस्‍थिती असते. यंदाही या परीसरांमध्ये काल (ता.२४) सायंकाळी उशीरापर्यंत फूलविक्रेते दाखल झाले होते. दरवर्षीच्‍या तुलनेत यंदा खरेदीला कमी गर्दी असल्‍याने फूलांचे दर घसरतील असा अंदाज होता. परंतु ग्राहक प्रत्‍यक्ष खरेदीसाठी गेले असता, त्‍यांना चांगलाच खिसा हलका करावा लागला.

ऐरवी साधारणतः शंभर रूपये शेकडा या दराने मिळणारे झेंडूचे फुल यंदा थेट दीडशे ते तीनशे रूपये शेकडा या दराने विक्री केले जात होते. तर जाळीला ऐरवी दोनशे ते तीनशे रूपये दर असतो. यंदा मात्र ग्राहकांना जाळीसाठी चारशे ते सहाशे रूपयांपर्यंत किंमत मोजावी लागली. अन्‍य फुलांच्‍या दरातही अशाच प्रकारे तेजी बघायला मिळाली. सुट्या फुलांप्रमाणे तयार माळादेखील यंदा महागल्‍या होत्‍या. व्‍यावसायिकांकडून साकारलेल्‍या या माळा शंभर रूपयांपासून सातशे ते आठशे रूपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्‍ध झाल्‍या होत्‍या. सण उत्‍सवाचे महत्त्व लक्षात घेता काहीसा खिसा हलका करत नागरीकांना चढ्या दराने फुले, माळांची खरेदी करावी लागली. 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;

अवकाळीचा परीणाम 

गेल्‍या काही दिवसांपासून अवकाळी पावसाच्‍या हजेरीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अन्‍य पिकांप्रमाणे फुलशेतीदेखील या अवकाळीमुळे प्रभावित झाली असून, यातून उत्‍पन्नात झालेल्‍या घटीमुळे फुलांच्‍या दरात वाढ झाल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला जातो आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही फुलांच्‍या किंमती अधिक राहिल्या. अवघ्या काही दिवसांवर आलेल्‍या दिवाळीच्‍या सणातही फुलांना मागणी होत असल्‍याने, तेव्‍हापर्यंत दर सामान्‍यावर येतील, असा अंदाज व्‍यक्‍त केला जातो आहे.

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flower prices were high in the market nashik marathi news