तुर्कस्तानचा कांदा नकोच! व्यापाऱ्यांची झाली चांगलीच हौस; परदेशी कांद्याला खरेदीदारांकडुन ठेंगा

दिपक आहिरे
Monday, 9 November 2020

सोमवारी (ता. 9) पिंपळगाव बाजार समितीचे लिलावात परदेशी कांदा विक्रीसाठी आणला नाही. स्थानिक कांद्याचे दर आज पुन्हा सरासरी पाचशे रूपये दराने वधारून उन्हाळ कांद्याला 4500 तर लाल कांद्याला चार हजार रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

नाशिक : पिंपळगाव बसवंतमध्ये सुमारे दोन टन कांदा तुर्कस्तान, इजिप्त, अफगाणिस्थानहून आयात करण्याची आगळीक काही व्यापाऱ्यांनी केली. पण त्या व्यापाऱ्यांसाठी ही आयात हातबट्ट्याचा धंदा ठरत आहे. शनिवारी (ता. 7) तुर्कीच्या कांद्याला अवघा दीड हजार रूपये दर मिळाल्यानंतर आयातदारांना मोठा आर्थिक झटका बसला. त्यांनी सोमवारी (ता. 9) पिंपळगाव बाजार समितीचे लिलावात परदेशी कांदा विक्रीसाठी आणला नाही. स्थानिक कांद्याचे दर आज पुन्हा सरासरी पाचशे रूपये दराने वधारून उन्हाळ कांद्याला 4500 तर लाल कांद्याला चार हजार रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

25 दिवसाचा प्रवास करून कांदा पिंपळगावात आला खरा, पण...

आकाराने जम्बो, उग्रवास व त्यात चवीचा वांधा असल्याने भारतीय नागरिकांच्या कसोटीला तुर्की, इजिप्त व अफगाणिस्थानचा कांदा गत वर्षी उतरला नव्हता. तीच स्थिती यंदा ही राहण्याची स्थिती आहे. व्यापाऱ्यांनी पाकिस्तान धार्जिण्या देशाचा कांदा आयात करून दरातील तेजीत हात धुण्याचा प्रयत्न केला. पण अंगलट येण्याची चिन्ह आहेत. हजारो किलोमीटर व 25 दिवसाचा प्रवास करून कांदा पिंपळगांवात आला खरा, पण त्याचा दर्जा व वजनात मोठा घसारा झाला आहे. प्रतवारी करतांना बहुतांश कांदा सडल्याने तो फेकुन देण्याची वेळ आली आहे.

खरेदीदारांकडुन ठेंगा...

पिंपळगाव बाजार समितीत शनिवारी (ता. 7) तुर्कीचा कांदा विक्रीसाठी आला. तो बघण्यासाठी व्यापारी व शेतकऱ्यांची गर्दी झाली. पण अवघा दीड हजार रूपये दर मिळाला. त्यामुळे आयातदारांना पहिल्याच दिवशी दणका बसला. खरेदीदारांनी ठेंगा दाखविल्याने आज सोमवारी (ता. 9) पिंपळगांव बाजार समितीत परदेशी कांदा विक्रीसाठी आला नाही. आयातदारांना आता परराज्यात तो विक्रीसाठी पाठविण्याशिवाय पर्याय नाही.

हेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला

लाल कांद्याने पिंपळगाव बाजार समिती गजबजली

दरम्यान, पिंपळगाव बाजार समितीत शनिवारी परदेशी कांद्याने आणलेला दबाव दूर झाला. सरासरी पाचशे रूपयांना कांद्याच्या दरात सुधारणा झाली. उन्हाळ कांद्याची क्विंटल 13 हजार आवक होऊन सरासरी 4951 तर कमाल 6051 प्रतिक्विंटल दर मिळाले. लाल कांद्याने पिंपळगाव बाजार समिती गजबजली आहे. सरासरी 4100 रूपये तर कमाल 5900 रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To foreign onions Buyers refusal nashik marathi news