पॉलिहाउसमधील गुलाबांचे ४० कोटींवर नुकसान; लग्नसराई अन् सणासुदीच्या तयारीवर फिरले पाणी 

मुकुंद पिंगळे
Monday, 5 October 2020

‘व्हॅलेंटाइन डे’चा बाजार मोठ्या कष्टाने साधला. पुढे लग्नसराई, गणेशोत्सव अशा सणासुदीच्या दिवसांमध्ये दोन पैसे होतील, या आशेने पॉलिहाउसधारकांनी गुलाब उत्पादनाचे नियोजन केले. मात्र कोरोनामुळे गेले सहा महिने मागणी व पुरवठा साखळी विस्कळित झाल्याने ४० कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसला.

नाशिक : ‘व्हॅलेंटाइन डे’चा बाजार मोठ्या कष्टाने साधला. पुढे लग्नसराई, गणेशोत्सव अशा सणासुदीच्या दिवसांमध्ये दोन पैसे होतील, या आशेने पॉलिहाउसधारकांनी गुलाब उत्पादनाचे नियोजन केले. मात्र कोरोनामुळे गेले सहा महिने मागणी व पुरवठा साखळी विस्कळित झाल्याने ४० कोटींचा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे आता सांगा... पॉलिहाउसमधील गुलाबाचे करायचे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय. 

पॉलिहाउसमधील गुलाबाचे ४० कोटींवर नुकसान
जानोरी, मोहाडी, महिरावणी, मखमलाबाद, पंचवटी परिसर, शिलापूर, ओझर, आडगाव आदी परिसरात पॉलिहाउसमधील गुलाब लागवड अडीचशेहून अधिक क्षेत्रावर झाली आहे. लॉकडाउनमध्ये गुलाबाला मागणी नव्हती. मात्र जनजीवन हळूहळू सुरळीत होईल, असे शेतकऱ्यांना अपेक्षित असताना कोरोनाचे सावट फुलशेतीवरील दूर झालेले नाही. त्यामुळे लागवड शाबूत ठेवण्यासाठी फुले खुडून फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एप्रिल ते जुलै या लग्नसराईमध्ये बाजारात गुलाब फुलांची तेजी असते. मात्र यादरम्यान बाजार न फुलल्याने गुलाबाची ‘लाली’ गेली. एका महिन्यात एकरी सरासरी ५० हजार गुलाबपुष्पांचे उत्पादन अपेक्षित आहे. साडेसात कोटी गुलाबपुष्पे मातीमोल झाली आहेत. आतापर्यंत पीक व्यवस्थापन खर्च खिशातून पैसे घालून करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ज्यामध्ये मजुरी, फवारण्या, खते असा दर महिन्याला एकरी ३५ हजारांपासून ७५ हजारांपर्यंत खर्च करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. 

हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

लग्नसराई अन् सणासुदीच्या तयारीवर फिरले पाणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान बंद, लग्नसोहळे व इतर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी, मुख्य शहरांमध्ये बाजारपेठा बंद यामुळे काढणीला आलेली फुले फेकून द्यावी लागली. सहा महिन्यांत एकरी १५ लाखांचे नुकसान झाले. त्यातच निसर्ग चक्रीवादळासह वादळवाऱ्याने पॉलिहाउसचे कागद फाटले आहेत. त्यामुळे लागवडीला पावसाचा तडाखा बसल्याने डाउनी-भुरी व इतर बुरशीजन्य रोगांसह कीटकांचा प्रादुर्भाव वाढता आहे. त्यात भांडवल संपल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातून कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. 

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

गुलाबपुष्पांचे नुकसान 
महिना भाव रुपयांमध्ये उत्पादन नुकसान रुपयांमध्ये 
एप्रिल ते जुलै साडेपाच २ लाख ११ लाख 
ऑगस्ट ते सप्टेंबर साडेतीन दीड लाख सव्वापाच लाख 

 

संपूर्ण लॉकडाउनमध्ये रुपया मिळाला नाही. उसनवारी करून आणि प्रसंगी घरातील ऐवज मोडून लागवड जगविण्याची वेळ आली. त्यात पुन्हा रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने धीर सुटला आहे. त्यामुळे बँकेच्या कर्जाचे हप्ते नियमित फेडणे शक्य नाही. अशा परिस्थितीत सरकारने आधार द्यायला हवा. -विश्वनाथ विधाते, गुलाब उत्पादक, जानोरी 

उत्पादन खर्च करूनही उत्पन्नाचे गणित नकारात्मक व व्यस्त आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीवर उभा केलेला पीक प्रयोग रुजवून कोरोनामुळे तो अडचणीत सापडला आहे. या पिकामुळे रोजगारनिर्मिती होऊन बाजारपेठ खुलते. त्यामुळे सरकारने गुलाबशेतीच्या प्रश्‍नांकडे आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. -संजीव रासने, गुलाब उत्पादक, महिरावणी 

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: forty crore loss of roses in polyhouse nashik marathi news