ह्रदयद्रावक! "कारभारणीला घेऊन संगे जगण्यासाठी लढतो आहे.." लॉकडाऊनमध्ये दिव्यांग दांपत्याची जगण्यासाठी लढाई 

भाग्यश्री गुरव : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 13 जुलै 2020

"कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे... पडकी भिंत बांधतो आहे... चिखल- गाळ काढतो आहे... मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, तुम्ही फक्त लढ म्हणा...' या ओळींप्रमाणेच जिद्दीने लाकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडलेले बहुविकलांग दांपत्य आपल्या दोन चिमुकल्यांसह संसारचं रुतलेलं गाडं रुळावर आणण्यासाठी धडपडत आहे. वाचा त्यांची ह्रदयद्रावक कहाणी

नाशिक : "कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे... पडकी भिंत बांधतो आहे... चिखल- गाळ काढतो आहे... मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, तुम्ही फक्त लढ म्हणा...' या ओळींप्रमाणेच जिद्दीने लाकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पंचवटी परिसरातील गुंजाळनगरात राहणाऱ्या अमित व सीमा मुळे हे बहुविकलांग दांपत्य आपल्या दोन चिमुकल्यांसह संसारचं रुतलेलं गाडं रुळावर आणण्यासाठी धडपडत आहे. 

संसारचं रुतलेलं गाडं रुळावर आणण्यासाठी धडपड 
अमित यांना जन्मतः सेरेब्रल पाल्सी आजार असल्याने त्यांना चालण्याचा प्रॉब्लेम. त्यांच्यावर आठ ते दहा शस्त्रक्रिया झाल्या. या आजारावर मात करीत पुणे येथे प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र 2007 मध्ये व्यावसायिक कामानिमित्त मुंबई येथे गेले असताना चालत्या रेल्वेमध्ये धक्का लागून पडल्याने रेल्वेचे तीन डबे दोन्ही पायांवरून गेले. सलग तीन वर्षे अमित पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु यात त्यांचा डावा पाय मांडीपर्यंत काढून टाकावा लागला. तरीही त्यांनी खचून न जाता त्यातून बाहेर पडत संपूर्ण देशात बालक व युवकांसाठी संस्कारक्षम कथाकथन कार्यक्रम शाळा व महाविद्यालयांमध्ये सादर करण्याचे काम करून उदरनिर्वाह सुरू केला. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सारं उत्पन्न मिळवण्याचे त्यांचे साधनच बंद झाले आहे. तरीही अमित यांनी ऑनलाइन संस्कार वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास हवा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याने हाती निराशा आली आहे. पत्नी सीमाही दिव्यांग असूनदेखील टेलरिंगचे काम करतात. मात्र हिरावाडी परिसरात कोरोनाची रुग्ण संख्या जास्त असल्याने त्यांचेदेखील काम बंद आहे. मुळे दांपत्याला एक मुलगा व मुलगी आहेत. चार महिने त्यांनी घरात बसून काढले. मात्र आता त्यांना गरज आहे, ती आर्थिक मदतीची. 

हेही वाचा > खून झालेल्या युवकावर बलात्काराचा गुन्हा..? युवती गर्भवती राहिल्याने झाला खुलासा

आर्थिक मदतीची अत्यंत आवश्‍यकता
जवळपास पुढील एक वर्ष कथाकथनाचा कार्यक्रम मिळणे शक्‍य वाटत नसल्याने मला आर्थिक मदतीची अत्यंत आवश्‍यकता आहे. घरात लहान मुले, दिव्यांग पत्नी, घरभाडे, घरखर्च यासाठी शासनाकडून काही तरी मदत मिळावी. - अमित मुळे, नाशिक 

हेही वाचा > ‘आम्ही पोलिस आहोत’ असा विश्वास दाखवला..अन् निवृत्त एसटी कर्मचाऱ्यासोबत केले असे..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Found in a lockdown crisis Divyang couple fight for survival nashik marathi news