"गो कोरोना गो'! आरडाओरडा करत "त्यांचा' ड्रोन उडाला हवेत....अन् मग...

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 6 April 2020

पंतप्रधानांनी रविवारी (ता. 5) रात्री 9 वाजेपासून 9 वाजून 9 मिनिटांपर्यंत दिवे लावण्याचे आवाहन केले होते. कोरोना विषाणूविरोधात लढणाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी हे आवाहन करण्यात आलेले होते. त्यानुसार नाशिक शहरात ठिकठिकाणी दिवे लावण्यात आले. परंतु याहीवेळी काही अतिउत्साही नागरिकांनी त्याचा गैरअर्थ घेतल्याचे दिसून आले. 

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 5) रात्री 9 वाजेपासून 9 वाजून 9 मिनिटांपर्यंत दिवे लावण्याचे आवाहन केले होते. कोरोना विषाणूविरोधात लढणाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी हे आवाहन करण्यात आलेले होते. त्यानुसार नाशिक शहरात ठिकठिकाणी दिवे लावण्यात आले. परंतु याहीवेळी काही अतिउत्साही नागरिकांनी त्याचा गैरअर्थ घेतल्याचे दिसून आले. 

"गो कोरोना गो...पडले महागात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देताना, पखाल रोडवरील अपार्टमेंटसमोर हवेत ड्रोन उडवून "गो कोरोना गो'च्या घोषणाबाजी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई नाका पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे. तर दुसरीकडे अंबड-सिडको परिसरातही मोठ्याप्रमाणात फटाक्‍यांची आतषबाजी करतानाच काही ठिकाणी जमावाने येत घोषणाबाजी केल्याचे अनेक प्रकार घडलेले असतानाही याबाबत एकही गुन्हा अंबड पोलिसात दाखल नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त होते आहे. 

ड्रोनला मोबाईल फोनही जोडला
मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पखाल रोडवर निलोफर अपार्टमेंट आहे. मुंबई नाका पोलिसांचे रात्रीचे गस्तीपथकातील बिटमार्शल किशोर सूर्यवंशी, आप्पा पानवळ हे गस्तीवर असताना, या निलोफर अपार्टमेंटच्या समोर सार्वजनिक ठिकाणी संशयित राहुल आनंदा पेखळे, सुमित संजय कोरपड, प्रथमेथ सुरेश निचळ, किरण अशोकराव विंचूरकर (सर्व रा. निलोफर अपार्टमेंट, सप्तशृंगी कॉलनी, पखाल रोड, नाशिक) हे चौघे विनापरवानगी जमा होऊन "गो कोरोना गो' अशी जोरजोरात आरडाओरडा करीत घोषणाबाजी देत होते. तसेच, त्यांनी हवेमध्ये ड्रोन कॅमेरा उडविला. या ड्रोनला त्यांनी मोबाईल फोनही जोडला होता. गस्ती पथकाने ड्रोनसह मोबाईल जप्त केला आणि चौघांना ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलिस उपायुक्त अमोल तांबे, मुंबई नाक्‍याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ हे दाखल झाले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा > CoronaFighters : "आधी लढा कोरोनाशी नंतरच लगिन!''...असा निर्धार 'त्यांचा' पक्का
 
अंबड पोलिसांचे मात्र दूर्लक्ष 
दरम्यान, अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिडको, अंबड, केवळपार्क या परिसरात मोठ्याप्रमाणात रस्त्यावर उतरून घोषणाबाजी आणि फटाक्‍यांची आतषबाजी करण्यता आले. परंतु यासंदर्भात एकही गुन्हा अंबड पोलिसात दाखल झालेला नाही. त्यामुळे अंबड पोलिसांचे गस्तीपथक रस्त्यावर होते की नाही याबाबतच शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.

हेही वाचा > photos : 'सरकार मायबाप या संकटातून बाहेर काढा!'...शेतक-यांची आर्त हाक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four arrested for shouting and flying drone in air nashik marathi news