महासभेतल्या राड्यानंतर महापौरांच्या अधिकाऱ्यांना सूचना; अन् व्यक्त केली नाराजीही

विक्रांत मते
Thursday, 21 January 2021

महासभेत शिवसेनेने घातलेल्या राड्याबद्दल महापौर कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांना गाऱ्हाणी मांडण्याचा अधिकार असला तरी तो योग्य पद्धतीने मांडला पाहिजे. नाशिक रोडचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मी चेहेडी पंपिंगचा दौरा केला होता. त्यानंतर गंगापूर धरण ते नाशिक रोडदरम्यान १८.९१ कोटी रुपये खर्चाच्या जलवाहिनीला मंजुरी दिली.

नाशिक : नाशिक रोड विभागात होणाऱ्या दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यावरून महासभेत झालेल्या राड्याच्या पार्श्‍वभूमीवर आश्‍वासनाची पूर्तता करत महापौर सतीश कुलकर्णी यांनी बुधवारी (ता. २०) रामायण बंगल्यावर नाशिक रोडच्या नगरसेवक व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. २५ जानेवारीपासून नाशिक रोड विभागासाठी वाढीव व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. 

चार दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठ्याच्या सूचना

नाशिक रोड विभागात काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने मंगळवारच्या महासभेत मोठे रणकंदन घडले. महापौरांच्या दालनात शिवसेनेच्या नगरसेवकांनी धरणे देत राजदंड पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, मुकेश शहाणे, हेमंत शेट्टी आदींनी शिवसेनेचा हल्ला परतून लावला. वादाच्या पार्श्‍वभूमीवर महापौर कुलकर्णी यांनी नाशिक रोडच्या पाणीप्रश्‍नावर स्वतंत्र बैठक घेण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार बुधवारी बैठक झाली. या वेळी महापौरांनी शिवसेनेकडून घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. २५ जानेवारीपासून सुरळीत, स्वच्छ व चार दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. उपमहापौर भिकूबाई बागूल, सभागृहनेते सतीश सोनवणे, नगरसेवक संभाजी मोरुस्कर, प्रा. शरद मोरे, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, पंडित आवारे, सुनील गोडसे, सत्यभामा गाडेकर, ज्योती खोले, जयश्री खर्जुल, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत, उपअभियंता राजेंद्र पालवे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण

राडा सभाशास्त्राला धरून नाही 

महासभेत शिवसेनेने घातलेल्या राड्याबद्दल महापौर कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांना गाऱ्हाणी मांडण्याचा अधिकार असला तरी तो योग्य पद्धतीने मांडला पाहिजे. नाशिक रोडचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मी चेहेडी पंपिंगचा दौरा केला होता. त्यानंतर गंगापूर धरण ते नाशिक रोडदरम्यान १८.९१ कोटी रुपये खर्चाच्या जलवाहिनीला मंजुरी दिली. मात्र महासभेत घातलेल्या गोंधळामुळे सभाशास्त्राच्या नियमांचा भंग तर झालाच त्याशिवाय नागरिकांमध्ये चुकीचा संदेश गेल्याचे सांगत महापौर कुलकर्णी यांनी भावना व्यक्त केल्या. 

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four MLD incremental water supply to Nashik Road nashik marathi news