२६५ ची गोणी ३२५ ला... तरी "तेरी भी चुप मेरी भी चुप'! कृषी विभागही सायलेंट मोडवर

yuriya.jpg
yuriya.jpg

नाशिक / येवला : तालुक्‍यात कपाशी, मका, बाजरी, कांद्याचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने सहाजिकच यूरियाचीही मोठी मागणी असते. जिल्ह्यात सर्वाधिक यूरिया येवल्यासाठी मिळूनही सध्या तालुक्‍यात कृत्रिम टंचाईच्या नावाखाली चढ्या दराने विक्री सुरू आहे. यूरियाची 266 रुपयांची गोणी 290 ते 350 रुपयांच्या दरम्यान विक्री होत आहे. उधारीमुळे शेतकरीही तक्रारी करत नसल्याने कृषी विभागही सायलेंट मोडवर असून, "तेरी भी चुप मेरी भी चुप' असे चित्र दिसतेय. 

उधारीमुळे शेतकरी शांत; येवल्यात सर्वाधिक यूरिया येऊनही लूटमार 
तालुक्‍यात वर्षानुवर्षे यूरियाचा काळा बाजार चालतो, यापूर्वीदेखील येथे अनेक कारवाया झाल्या आहेत. यंदा सुरवातीपासून चांगला पाऊस असल्याने पिकेही जोमात आहेत. त्यातच खतांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्याने शेतकरी स्वस्त व मस्त म्हणून यूरियाला पसंती देतात. तालुक्‍यासाठी जिल्ह्यात सर्वाधिक 416 टन इतका यूरिया मिळूनही गावोगावी विक्रेते लिंकिंगची सक्ती करून चढ्या दराने विक्री करत आहेत. या संदर्भात ओरड होत असून, अनेकांनी कृषी विभागाकडे गाऱ्हाणे पोचविले. मात्र शेतकरी लेखी तक्रारी करत नसल्याने कृषी विभाग फक्त तपासणी करून विक्रेत्यांना समज देण्यातच व्यस्त आहे. 

कृषी विभागही सायलेंट मोडवर
एकतर विक्रेते यूरियाची टंचाई दाखवितात किंवा सुफला, पोषक आदी खतांची सक्ती करत असून, गोणीला गोणी फॉर्म्युला अवलंबत आहेत. अनेक ठिकाणी तर सर्रास वाढीव दराने विक्री सुरू असून, शेतकरी मात्र निमूटपणे वाढीव पैसे व लिंकिंगने खरेदी करत असून, तक्रारीसाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. 

अंदरसूलला कारवाई 
शेतकऱ्याच्या तक्रारीवरून सोमवारी (ता. 29) अंदरसूल येथील सद्‌गुरू कृषी सेवा केंद्रावर कृषी विभागाने विक्री बंदची कारवाई केली आहे. मोहीम अधिकारी आर. एम. गायकवाड, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रशांत वास्ते आदींनी ही कारवाई केली. तक्रार करून पाठपुरावा केला तर कारवाई होतेच, त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढे येऊन चढ्या दराने विक्री व लिंकिंगच्या तक्रारी करणे गरजेचे आहे. 

यामागील गौडबंगाल नेमके काय समजावे?
मागणी असल्याचा गैरफायदा घेऊन 30 ते 70 रुपये चढ्या दराने यूरियाची गोणी विक्री होत आहे. अनेक विक्रेते यूरिया गोणीला जोडी इतर खतांची गोणी घेण्याची सक्ती करीत आहेत. मुळात अनेक सहकारी संस्था खते घेण्यासाठी तयार असून, संस्था शासकीय दराने खते विक्री करतात. सहकारी संस्थांना 35 टक्के खते देणे बंधनकारक असताना कृषी विभाग मात्र विक्रेत्यांना खते देण्यात धन्यता मानतो, यामागील गौडबंगाल नेमके काय समजावे? -मकरंद सोनवणे, संचालक, बाजार समिती, येवला 

आमच्याकडे लेखी तक्रार नसली तरी तोंडी आलेल्या तक्रारीची दखल घेऊन आम्ही दुकानांच्या तपासण्या करीत आहोत. अंदरसूल येथील सद्‌गुरू कृषी सेवा केंद्रावर आजच कारवाई केली. तसेच वैजापूर तालुक्‍यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी अंदरसूल भागात येत असल्याने विक्रेत्यांना तालुक्‍यातील शेतकऱ्यांना खते विक्रीच्या सूचना केल्या आहेत. -प्रशांत वास्ते, कृषी अधिकारी, येवला 

सर्वच विक्रेते यूरियाला जोडी दुसऱ्या खताच्या गोणीची सक्ती करत आहेत. शिवाय टंचाई भासवत किंमतही वाढून घेत असल्याचे व्हिडिओ आम्ही काढले आहेत. या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रार करणार आहोत. शेतकऱ्यांची लूटमार सुरू राहिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू. -हरिभाऊ महाजन, अध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना, येवला 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com