खोटे सोने विकणाऱ्याच्या हातात 3 वर्षानंतर बेड्या; अद्यापही एकाचा शोध सुरूच 

संतोष विंचू
Sunday, 11 October 2020

येवला, अंदरसुल, कोपरगाव परिसरात बाहेरच्या व्यापाऱ्यांना स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने बोलून खोटे सोने देऊन लुटण्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

नाशिक : (येवला) पिंपळगाव जलाल (ता.येवला) मध्ये २०१७ साली तीन आरोपींनी एकाला खोटे सोने देऊन तीन लाख रुपयांना फसवले होते. यातील एक आरोपी पकडला व नंतर जामिनावर सुटलाही.. मात्र दोन आरोपींचा पोलिसांना पत्ताच लागता नव्हता. या आरोपींच्या मागावर असतातच माग काढत अखेर तीन वर्षानंतर या घटनेतील मुख्य संशयिताला शहर पोलिसांनी शिताफीने पकडून जेरबंद केले आहे. आता तिसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहे. 

स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखवून फसवणुक

येवला, अंदरसुल, कोपरगाव परिसरात बाहेरच्या व्यापाऱ्यांना स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने बोलून खोटे सोने देऊन लुटण्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशीच घटना २४ मार्च २०१७ रोजी पिंपळगाव जलाल शिवारात घडली होती. यासंदर्भात झारखंड राज्यातील मिथुन कुमार यादव यांनी फिर्याद दिली होती. संशयितांनी यादव यांना स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने  बोलून घेत तीन लाख रुपये घेऊन त्याच्या मोबदल्यात बनावट सोन्याच्या अंगठ्या दिल्या होत्या. यातील संशयित सोमनाथ उर्फ सुनील पांडुरंग अहिरे (रा.गुजरखेडे) व बिस्कीटया बलाड्या भोसले यांनी अजून एका साथीदारासह  यादव यांची फसवणूक केली होती. याप्रकरणी सोमनाथ अहिरे ह्यास त्यावेळी पोलिसांनी अटक केली होती. परंतु त्याचे इतर दोन्ही साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले होते. पोलिसांकडून त्यांचा माग घेतला जात होता. मात्र ते मिळून येत नव्हते. 

हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

तिसऱ्या संशयिताचा शोध सुरु

यातच तीन वर्षानंतर पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बिस्कीटया भोसले हा दिवसभर बाहेर राहून उंदीरवाडी येथे रात्री घरी येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे बा.बा.कांदळकर, श्याम जाधव यांनी पाळत ठेवून त्याचा शोध घेतला व उंदरीवाडी परिसरात सापळा रचत तीन वर्षापासून फरार असलेल्या भोसले ह्यास मोठ्या शिताफीने पकडले. संशयित भोसलेची पोलीस कसून चौकशी करीत असून फसवणूक केलेल्या तिसऱ्या संशयिताचा नावासह शोध घेत आहे. पोलीस निरीक्षक संदीप कोळी, श्री. कांदळकर या फसवणुकीचा तपास करत आहेत. 

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraudster arrested after three years nashik marathi news