"अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत तांदूळ" - छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 April 2020

तीन महिन्यांचा अन्नधान्य साठा आणि तीन महिन्यांचा मोफत तांदूळ एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्यास शिधावाटप दुकानांमध्ये साठवणूक करणे जिकिरीचे होईल ही बाब शिधावाटप दुकानदार संघटनांकडून शासनाच्या निदर्शनास आणण्यात आली.

नाशिक : राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल आणि मेसोबत जून महिन्याचे धान्य देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 19 मार्चला घेतला आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून 30 मार्च 2020 ला एप्रिल ते जून 2020 दरम्यान नियमित धान्यासोबतच प्रतिमहिना माणशी पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची अधिकृत सूचना शासनास प्राप्त झाली आहे. त्यानुसार राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी तांदूळवाटप केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी (ता. 1) दिली. 

दोन दिवसांत धान्याची वाहतूक करण्यासाठी मर्यादा
तीन महिन्यांचा अन्नधान्य साठा आणि तीन महिन्यांचा मोफत तांदूळ एकत्रितपणे उपलब्ध करून दिल्यास शिधावाटप दुकानांमध्ये साठवणूक करणे जिकिरीचे होईल ही बाब शिधावाटप दुकानदार संघटनांकडून शासनाच्या निदर्शनास आणण्यात आली. तसेच केंद्र सरकारने 30 मार्चला मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेतल्यामुळे दोन दिवसांत धान्याची वाहतूक करण्यासाठी मर्यादा असल्यामुळे त्या त्या महिन्यामध्ये, त्या महिन्याचे धान्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा खात्याचे मंत्री भुजबळ यांनी दिली. 

हेही वाचा > धक्कादायक! दाम्पत्य दिवसभर घरातच बसायचे अन् रात्री घराबाहेर फिरायचे...कस्तुरबा रुग्णालयातील नर्सचे इगतपुरी कनेक्‍शन..

राज्यातील सात कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा मिळणार लाभ
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र रेशनकार्डधारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर, त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची केंद्र सरकारची सूचना आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशनकार्डधारकाला त्याने नियमित अन्नधान्याची खरेदी केल्यानंतर, माणशी पाच किलो तांदूळ त्या त्या महिन्यात मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील सात कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

हेही वाचा > लॉकडाउन दरम्यान पहाटे संशयास्पद कंटेनरला पोलीसांनी अडवला...झडती घेतली तेव्हा धक्काच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free rice to beneficiaries under Antyodaya Priority Family Plan said by chhagan Bhujbal nashik marathi news