द्राक्षपंढरीत फळबहार छाटण्यांना सुरवात; स्थानिक मजुरांना वाढली मागणी  

माणिक देसाई
Wednesday, 30 September 2020

बदलत्या हवामानाचा फटका मागील तीन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, यातच आता एवढे असतानादेखील चालू हंगामात तालुक्यातील २५ हजार हेक्टरवरील द्राक्षबागांच्या फळबहार छाटण्यांना सुरवात झाली आहे.

नाशिक / निफाड : बदलत्या हवामानाचा फटका मागील तीन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, यातच आता एवढे असतानादेखील चालू हंगामात तालुक्यातील २५ हजार हेक्टरवरील द्राक्षबागांच्या फळबहार छाटण्यांना सुरवात झाली आहे.

द्राक्षपंढरीत फळबहार छाटण्यांना सुरवात 

कोरोना महामारीच्या संकटात गेल्या हंगामात बहरास आलेल्या द्राक्षमालाच्या विक्रमी उत्पादनाला बाजारपेठेअभावी मातीमोल विक्री करावी लागली होती. त्यामुळे चालू हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा अडथळा येऊ नये म्हणून महिनाभराच्या विलंबाने गोड्याबार छाटण्या सुरू झाल्या असून, सर्वत्र मजुरांचे जथे वाहतूक सुरू झाली आहे. छाटणीपर्यंतचा पाच-सहा महिन्यांचा कालावधी द्राक्षवेलीला सुदृढ करण्याचा असतो. या कालावधीत द्राक्षवेलीला दिलेली सेंद्रिय खते, तसेच विविध रासायनिक खतांचे डोस यामुळे द्राक्षवेलीची काडी भक्कम होण्यास मदत होते. दर वर्षी ऑगस्ट, सप्टेंबरमध्येच द्राक्षबागांच्या गोड्याबार छाटण्यांना वेग येतो, मात्र चालू हंगामात सततचा पाऊस अन् वातावरणीय बदल हा द्राक्षवेलीच्या आरोग्याला धोकादायक असल्याने पाऊस उघडल्यानंतरच द्राक्षबागांच्या गोड्याबार छाटण्यांना सुरवात केली गेली आहे. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

स्थानिक मजुरांना वाढली मागणी 
द्राक्षबागांच्या छाटणीपासून ते द्राक्षमाल काढणीपर्यंतच्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीसाठी पेठ, सुरगाणा, गुजरात-डांग आदी भागातून मजूर येत असतात. मात्र या हंगामात कोरोना महामारीच्या संकटामुळे मजुरांचे स्थलांतर घटल्याने स्थानिक मजुरांना मागणी वाढली आहे. द्राक्षबागेच्या छाटणीसह काडीवर औषध लावणे, नवीन फुटव्यातील निकामी पाने, फांद्या काढणे, द्राक्षमालाची डिपिंग करणे या कामांना छाटणीनंतर वेग येत असतो. त्यामुळे या कामांसाठी टेंडर पद्धतीने आगाऊ स्वरूपात करारदेखील कामगार व शेतकरी यांच्यादरम्यान केले जात आहेत. यातच मजुरांना शेतापर्यंत जाण्यासाठी चारचाकी वाहनांचाही भाडेतत्त्वावर वापर वाढला आहे. त्यामुळे द्राक्षपंढरीत कोरोना महामारीतही रोजगाराची व्याप्ती टिकून आहे. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

बदलत्या हवामानात २५ हेक्टर क्षेत्रावर छाटणी 
मागच्या हंगामात द्राक्षमालाचे उत्पादन भरघोस येऊनही कोरोनामुळे द्राक्षमालाचा बाजारभाव खूप कमी होता. यामुळे उत्पादकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. त्यामुळे चालू हंगामात रोगप्रतिकारक औषधांची अधिक मात्रा लागू नये याकरिता द्राक्ष उत्पादक प्रयत्नशील आहेत. -स्वरूपानंद बोरगुडे, द्राक्ष उत्पादक, नैताळे 

गेल्या हंगामात भरपूर व निर्यातक्षम उत्पादनानंतरही लॉकडाउनचा फटका बसल्याने उत्पादन खर्चही निघाला नव्हता. त्यामुळे कर्जाचा डोंगर द्राक्ष उत्पादकांवर तसाच आहे. त्यामुळे चालू हंगामात द्राक्षाच्या दर्जेदार व निरोगी उत्पादनावरच मदार आहे. -अजित तासकर, शेतकरी, दिंडोरी तास 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fruit pruning begins in nifad nashik marathi news