
नाशिक : शहरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरऐवजी थेट पाइपलाइनने गॅस पुरविण्याच्या योजनेचा टप्पा लॉकडाउनमुळे लांबला असला तरी आठ महिन्यांत २६ हजार ठिकाणी जोडणीची नोंदणी करण्यात महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला यश आले आहे.
गंगापूर रोड, आनंदवली, पाथर्डी फाटा व इंदिरानगर येथे नव्याने तयार झालेल्या नवनगरांतील इमारतीमधील फ्लॅट व बंगल्यांपर्यंत जोडणी पोचल्याचा दावा कंपनीने केला आहे. शहराच्या विस्तारात स्वयंपाकाच्या गॅससह वाहनांसाठी वापरला जाणाऱ्या पर्यावरणपूरक कॉम्पॅक्ट नॅचरल गॅसच्या (सीएनजी) वापरात वाढ होत आहे. नाशिकला स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर मिळते. मात्र सिलिंडर वाहतुकीला परवडणारे नाही, तसेच नाशिकला सीएनजी इंधनावर वाहन धावत नाही. नाशिकमध्ये गॅसची उपलब्धता नसल्याने वाहनधारकांकडून पेट्रोल किंवा डिझेलचा वापर होतो. परंतु केंद्राने देशातील १७४ शहरांत गॅसची पाइपलाइन टाकण्याची योजना आखली असून, पहिल्या टप्प्यात नाशिकचा समावेश आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीतर्फे शहरात १८० किलोमीटरचे मुख्य पाइपलाइनचे जाळे टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
विल्होळी नाका येथे महापालिकेशी करार करून सीएनजी स्टेशन उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. मुख्य पाइपलाइन खोदण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. त्यामुळे इमारत व त्यापुढे प्रत्येक घरापर्यंत गॅसजोडणीच्या कामाला सुरवात झाली आहे. पुणेस्थित काही कंपन्यांकडून गंगापूर रोड, इंदिरानगर व पाथर्डी फाटा येथे जानेवारीत प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. लॉकडाउन जाहीर झाल्याने तब्बल पन्नास दिवस काम लांबल्याने डिसेंबरअखेर संपूर्ण शहर गॅस जोडणीने व्यापण्याचे प्रयत्न लांबले. महापालिकेने नव्याने तयार होणाऱ्या इमारतींना प्रत्येक सदनिकेला जोडणारे गॅस पाइपलाइन टाकण्याच्या सूचना दिल्या. आतापर्यंत नवीन इमारतींत तीस हजार जोडण्यांचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण इमारतीचे एकत्रित कनेक्शन इमारतीबाहेर म्हणजे जेथून १८० किलोमीटरची मुख्य पाइपलाइन जाणार आहे, तेथपर्यंत आणून सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मीटरप्रमाणे गॅसचे दर
सध्या घरगुती वापराचे सिलिंडर सातशे रुपये, तर इतर वापरासाठीचे सिलिंडर बाराशे रुपयांपर्यंत प्राप्त होते. ज्या इमारतींना नॅचरल गॅसच्या जोडण्या मिळाल्या आहेत. त्यामधील सदनिकाधारकांना मीटर रीडिंगप्रमाणे गॅस प्राप्त होईल. पाणी किंवा वीजवापराप्रमाणेच गॅस वापराचे दर आकारले जातील. सीएनजी गॅसच्या पहिल्या टप्प्यात सिलिंडर स्वरूपात पुरवठा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.