esakal | ग्रामीण रुग्णालय कर्मचारी वसाहत धोकादायक स्थितीत; तक्रारी करूनही प्रतिसाद नाहीच
sakal

बोलून बातमी शोधा

ghoti rural hospital.jpg

वसाहतीभोवतालची कंपाउंड व अंतर्गत रस्त्यांची वाताहात झाली आहे. परिसरात वाढलेली झाडी-झुडपे यांसह तुटलेले दरवाजे, खिडक्या, पाडलेल्या भिंती यामुळे अक्षरशः जीव धोक्यात घालून वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांना राहावे लागत आहे. 

ग्रामीण रुग्णालय कर्मचारी वसाहत धोकादायक स्थितीत; तक्रारी करूनही प्रतिसाद नाहीच

sakal_logo
By
गोपाळ शिंदे

घोटी (नाशिक) : घोटी ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी निवास्थाने धोकादायक झाल्याने, जीव मुठीत धरून कुटुंबीयांना राहावे लागत आहे. बांधकाम विभागाला अनेक दुरुस्तीसाठी तक्रारी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. सदावर्ते यांनी सांगितले. 

जुनाट बांधकामाला गळती

घोटी ग्रामीण रुग्णालय १९८४ ला नवीन जागेत निधी व स्थलांतर झाले. तत्कालीन आरोग्यमंत्री बळिराम हिरे, सरपंच गणपत कडू, माजी सरपंच इंदर सुराणा यांच्या अथक पाठपुराव्याने ग्रामीण रुग्णालय उभे राहिले. मात्र त्यानंतर या रुग्णालयाच्या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न झाले नाहीत. इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस असल्याने जीर्ण झालेल्या जुनाट बांधकामाला गळती लागली आहे. घोटी ग्रामीण रुग्णालय तालुक्यातील खेड्यांना मध्यवर्ती व सोयीचे असल्याने रुग्णालयात रोज तीनशे ते चारशेहून अधिक रुग्ण असतात. रुग्णांना योग्य वैद्यकीय सुविधा देताना अधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 

कंपाउंड व अंतर्गत रस्त्यांची वाताहात 

काही वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्याची जागा रिक्त असल्याने अन्य अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. नागरिकांच्या हितासाठी आहोरात्र काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था नाही. पावसाळ्यात निवासांना गळती लागते. ड्रेनेजचे पाणी वसाहतीभोवती जमा होत असल्याने दुर्गंधीचा सामना अधिकारी-कर्मचारी यांना करावा लागतो. वसाहतीभोवतालची कंपाउंड व अंतर्गत रस्त्यांची वाताहात झाली आहे. परिसरात वाढलेली झाडी-झुडपे यांसह तुटलेले दरवाजे, खिडक्या, पाडलेल्या भिंती यामुळे अक्षरशः जीव धोक्यात घालून वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांना राहावे लागत आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

निवास्थाने, रुगणालय इमारती व संरक्षक भिंतीची संपूर्ण वाताहात झाली आहे. गेट क्रमांक एकवर अतिक्रमण करण्यात आले आहे. जुनाट पद्धतीचे एक्सरे- मशिन वर्षभरापासून बंद आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याची जागा रिक्त आहे. याबाबत अनेकदा प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र कोणत्याही प्रकारचे सहकार्य लाभले नाही. यामुळे रुग्णालयात सेवा देताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. - डॉ. डी. एस. सदावर्ते, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, घोटी 

गरीब, गरजू रुग्णांच्या सोयी-सुविधांसाठी महत्त्वाच्या ग्रामीण रुग्णालयातील निवास्थाने दुर्लक्षित आहेत. मंत्रालय स्तरावर सहा महिन्यांपूर्वी उपजिल्हा रुगणालय व नवीन इमारतीसाठी मंजुरी व मागणीचा प्रस्ताव पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पाठविला आहे. पुढील बैठकीत विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. - हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा

go to top