रस्त्याचे वाजले तीन तेरा! गुडघाभर चिखलातून काढावी लागतेय वाट; शेतकरी संतप्त

विजयन पाटील
Monday, 28 September 2020

गेल्या वर्षी ग्रामपंचायत मार्फत रोहयो अंतर्गत ह्या पाणंंद रस्त्याच्या कामास सुरुवात झाली होती पण काही कारणास्तव रस्त्याचे काम थांबले तेंव्हापासून या रस्त्याचे काम अपूर्णच राहिल्याने रस्ता चिखलातच आडकला की काय असा प्रश्न निर्माण होतो आहे

नाशिक : (गिलाणे) गिलाणे ते बेडी पाणंद रस्त्याचे काम अनेक दशकांपासून अपूर्णच राहिल्याने पावसाळ्यात या रस्त्याचे तीन तेरा झाल्याने शेतकऱ्यांना गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागत असल्याने परिसरातील शेतकरी वर्गास त्रासास सामोरे जावे लागत आहे. जवळपास निम्म्याहून अधिक ग्रामस्थ मळ्यात स्थायिक झाले असून त्यांचा वावर याच रस्त्याने होत असतो. विद्यार्थी , शेतमजूर, कामगार, शेतकरी, रुग्ण, अबाल वृद्ध याच रस्त्याचा वापर नियमित करीत असतात मात्र चिखलातून वाट काढताना सर्वांची त्रेधातिरपीट उडत आहे.

अन्यथा शेतकऱ्यांचे आंदोलन

गेल्या वर्षी ग्रामपंचायत मार्फत रोहयो अंतर्गत ह्या पाणंंद रस्त्याच्या कामास सुरुवात झाली होती पण काही कारणास्तव रस्त्याचे काम थांबले तेंव्हापासून या रस्त्याचे काम अपूर्णच राहिल्याने रस्ता चिखलातच आडकला की काय असा प्रश्न निर्माण होतो आहे. गिलाणेचा हा पाणंद रस्ता शेतकऱ्यांना मोठा रहदारीचा रस्ता असल्याने त्यांना या रस्त्याशिवाय पर्यायच नाही. शेतीतील अवजारे, बैलगाडी, पशुधन शेतातील राशी या सर्वांचा वावर या रस्त्यावरूनच केला जात असताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पूर्णतः रस्ता चिखलमय झाल्याने जागोजागी खड्डे, चिखल, पाणी अशातच गिलाणें पाणंद रस्ता हरवला आहे की काय असे पाहावयास मिळत आहे. 
सदर हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाने त्वरित पाऊले उचलावीत अन्यथा शेतकरी वर्गाकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य पोपट आहीरे ,डॉ रविंद्र आहिरे,वसंत आहिरे,दिलीप आहिरे,ईश्वर आहिरे,चैत्राम आहीरे, आण्णा टेलर,संजय आहिरे, भारत अाहिरे,आदींनी दिला आहे. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

अनेक दशकांपासून दुर्लक्षित पण महत्वपूर्ण पाणंद रस्ता असून शेकडो नागरिकांचा वावर याच रस्त्याने होतो उन्हाळ्यात धूळ व पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर असते लोकप्रतिनिधींनी त्वरित हा रस्ता प्राधान्यक्रमाने तयार करावा - डॉ रवींद्र आहिरे, गिलाणे

कुणावर अन्याय न करता समोपचाराने मार्ग काढून रस्त्याचे काम झाल्यास शेकडो कामगार,विद्यार्थी,शेतमजूर,वृद्ध,रुग्ण यांच्या सोयीचे होईल. -डॉ संजय पाटील, माजी सरपंच, गिलाणे

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gilane to bedi condition of the road is very bad nashik marathi news