
गुणकारी आल्याला (अद्रक) अलीकडे मागणी वाढली आहे. कोरोनामुळे हजारो कुटुंबे आल्याचा आहारात प्राधान्यक्रमाने वापर करत असल्याने ही मागणी वाढली असली, तरी २०१७ नंतर सलग तीन वर्षांपासून अद्रकाचे भाव कमी होत असल्याने उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.
मालेगाव (जि. नाशिक) : गुणकारी आल्याला (अद्रक) अलीकडे मागणी वाढली आहे. कोरोनामुळे हजारो कुटुंबे आल्याचा आहारात प्राधान्यक्रमाने वापर करत असल्याने ही मागणी वाढली असली, तरी २०१७ नंतर सलग तीन वर्षांपासून अद्रकाचे भाव कमी होत असल्याने उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात विक्रमी उत्पादन
मराठवाड्यातील कन्नड, वैजापूर, गंगापूर या तालुक्यांत अद्रकाची शेती होते. येथील अद्रक शेतकरी कन्नडच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. तेथून व्यापाऱ्यांमार्फत ते इतरत्र विक्री होते. कन्नड मार्केटमधून नाशिक, मालेगाव, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, वाशी आदी बाजारात रोज पाचशे टनांच्या आसपास अद्रक विक्रीसाठी पाठविले जाते. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे अद्रकाचे क्षेत्रही वाढले आहे. अद्रकाचे भाव कमी झाल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. पिकासाठी एकरी दीड लाख रुपये खर्च येतो. भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
हेही वाचा - सावधान! आतापर्यंत पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे प्रकार आता माणसांवरही; महिलेचा बळी
बंगळुरूच्या अद्रकामुळे स्थानिक अद्रकाचे भाव कमी
नाशिकला रोज सहा टन, तर मालेगाव बाजारात रोज आठ टन आले विक्रीसाठी येत आहे. आले व्यवसायामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. कन्नडसह औरंगाबाद जिल्ह्यातील अद्रक महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान आदी राज्यांत जाते. येथील अद्रकाला बेंगळुरूहून येणाऱ्या अद्रकाचा सामना करावा लागतो. बेंगळुरूच्या अद्रकामुळे स्थानिक अद्रकाचे भाव कमी होत आहेत. बेंगळुरूच्या अद्रकाचे मोठे पंजे असल्याने त्याला बऱ्यापैकी भाव मिळत आहे.
गेल्या चार वर्षांतील अद्रकाचे भाव
वर्ष - किलो दर (घाऊक)
२०१७ - २५ रुपये
२०१८ - १५ रुपये
२०१९ - १३ रुपये
२०२० - १६ रुपये
हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप
गेल्या दोन वर्षांपासून अद्रकाचे भाव कमी झाले आहेत. थंडीत अद्रकाची मागणी वाढली आहे. त्यामुळे भाव काही प्रमाणात वाढू शकतील.
-पंकज खैरनार, घाऊक व्यावसायिक, मालेगाव
मी अनेक वर्षांपासून अद्रक विक्रीचा व्यवसाय करतो. बाजारात रोज ५० किलो अद्रकाची विक्री करतो. यातून दिवसाकाठी चारशे रुपये सहज मिळतात.
-अख्तर शेख, अद्रक विक्रेता