५१ वर्षांत दहाव्यांदा 'हे' धरण ओव्हरफ्लो; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

प्रमोद सावंत
Thursday, 17 September 2020

सलग दुसऱ्या वर्षी धरण भरल्याने खान्देशमधील रब्बीचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. धरण पुर्ण भरल्यानंतर सकाळी फक्त दरवाजा क्रमांक १ मधून १२३८ क्युसेस पाणी सोडण्यात आले होते. ठेंगोडा बंधाऱ्यावरुन गिरणा नदीत ५६७ तर हरणबारी धरणातून मोसम नदीत २५१ क्युसेस पाणी वाहत आहे.​

नाशिक/मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेले गिरणा धरण बुधवारी (ता.१६) सायंकाळी उशिरा ओव्हरफ्लो झाले. १९६९ ते २०२० या ५१ वर्षात दहाव्यांदा धरण पुर्णपणे भरले. धरणाचे गुरुवारी (ता. १७) दोन दरवाजे एका फुटापर्यंत उघडण्यात आले असून २ हजार ४६८ क्युसेस पाणी सोडले जात आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील कसमादेत जोरदार पाऊस झाल्यास धरणातून आणखी पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

गिरणा धरणाची साठवण क्षमता २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट आहे. प्रारंभी ९६ टक्के जलसाठा नियंत्रित करुन दरवाजे उघडण्यात येणार होते. मात्र चणकापूर, हरणबारी, केळझर व पुनंद या धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने दरवाजे उघडण्याऐवजी धरण भरुन घेण्याचा निर्णय झाला.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

रब्बीचे क्षेत्र वाढण्यास मदत

यापुर्वी १९७३, १९७६, १९८०, १९९४, २००४, २००५, २००६, २००७ व २०१९ असे नऊ वेळा धरण भरले होते. सलग दुसऱ्या वर्षी धरण भरल्याने खान्देशमधील रब्बीचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. धरण पुर्ण भरल्यानंतर सकाळी फक्त दरवाजा क्रमांक १ मधून १२३८ क्युसेस पाणी सोडण्यात आले होते. ठेंगोडा बंधाऱ्यावरुन गिरणा नदीत ५६७ तर हरणबारी धरणातून मोसम नदीत २५१ क्युसेस पाणी वाहत आहे. याशिवाय इतर नाल्यांचे पाणी नदीला मिळत आहे. धरणात दीड ते दोन हजार क्युसेस पाणी जमा होत आहे. त्यामुळे दुपारनंतर दरवाजा क्रमांक ६ देखील एका फुटाने उघडण्यात आला. सायंकाळपर्यंत दोन हजार ४६८ क्युसेस पाणी सोडले जात होते. 

एक दिवस आधी धरण ओव्हरफ्लो 

गेल्या वर्षी कसमादेसह संपुर्ण खानदेशात दमदार पाऊस झाला होता. गिरणा व मोसम या दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहिल्या. गेल्या वर्षी १७ सप्टेंबर २०१९ ला धरण पुर्ण भरले होते. या वर्षी देखील सुरवातीपासूनच कसमादे पट्ट्यात चांगला पाऊस होत गेल्याने गिरणा व मोसमच्या पुरपाण्याने धरण लवकर भरण्यास मदत झाली. गेल्या वर्षापेक्षा एक दिवस आधी म्हणजे १६ सप्टेंबर २०२० ला सायंकाळी उशिरा धरण ओव्हरफ्लो झाले. सन २००५ मध्ये २ ऑगस्टला धरण भरले होते. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

गिरणा धरणाचे पाणलोट क्षेत्र कसमादे परिसर आहे. या भागात पाऊस झाल्यास तसेच गिरणा व मोसम नदीतील पुरपाण्याची परिस्थिती पाहून धरणातील पाणी सोडले जाईल. नदीकाठावरील रहिवासी व गावांनी सतर्क रहावे. 
- हेमंत पाटील, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girana dam is overflowing nashik marathi news