हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वाट

दिपक खैरनार
Wednesday, 5 August 2020

 ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड वाट बघत होते. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच गावावर शोककळा पसरली होती. दोघा भावांनी मोठमोठ्याने आक्रोश केल्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.  काय घडले असे?​

नाशिक / अंबासन : ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड वाट बघत होते. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच गावावर शोककळा पसरली होती. दोघा भावांनी मोठमोठ्याने आक्रोश केल्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.  काय घडले असे?

ताई आता कोण बांधणार गं राखी.. ?

बोढरी येथील सारिका सुकदेव जाधव (वय २०) व मंगल सुभाष माळी (वय १९) या दोघी जिवलग मैत्रिणी घरात सरपण नसल्याने चार-पाच दिवसांपूर्वी गावाजवळील वनजंगलात गेल्या होत्या. सायंकाळपर्यंत त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी नातेवाइकांकड व इतरत्र शोध घेतला. अखेर शनिवारी (ता. १) जायखेडा पोलिस ठाण्यात याबाबत हरविल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनीही शोध सुरू केला. दरम्यान, सोमवारी (ता. ३) एक गुराखी जंगलाच्या दिशेने जनावरे चारण्यासाठी गेला असता, त्याला तलावात दोन मुलींचे मृतदेह तरंगताना आढळले. त्याने तातडीने याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर बिलपुरीचे पोलिसपाटील सुरेश आहिरे यांनी जायखेडा पोलिसांना कळविले. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवचरन पांढरे, उपनिरीक्षक स्वप्नील कोळी, हवालदार जे. एल. महाजन, पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र वाघ, उमेश भदाणे आदींनी घटनास्थळी दाखल होत ओळख पटवून पंचनामा केला.

रक्षाबंधनाच्या दिवशीच मैत्रिणींचा तलावात बुडून मृत्यू
तलावात पडलेल्या दोन्ही तरुणींचे मृतदेह कुजलेले असल्याने सटाणा येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. जगताप यांना पाचारण करीत जागेवरच विच्छेदन करण्यात आले. तलावाजवळ सरपण गोळा करीत असताना एकीचा पाय घसरल्याने तलावात पडली असावी व तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरीही तलावात बुडाल्याने दोघींचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.

भावंडांचा आक्रोश
ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच मंगल व सारिका यांचा बुडून मृत्यूचा प्रकार उघडकीस येताच त्यांच्या कुटुंबीयांनी व भावंडांनी हंबरडा फोडला. मंगल ही कुटुंबीयांची एकुलती लाडकी कन्या होती. तिच्या कुटुंबीयांसह दोघा भावांनी मोठमोठ्याने आक्रोश केल्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. 

हेही वाचा > जेव्हा साधु महाराजांच्या कुटियाच्या आवारातच घडतो धक्कादायक प्रकार...पोलीसांनी केला खुलासा

अकस्मात मृत्यूची नोंद

जंगलात सरपण काढण्यासाठी गेलेल्या दोघी मैत्रिणींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी उघडकीस आला. बोढरी (ता. बागलाण) येथे उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे रक्षाबंधनाच्या दिवशीच गावावर शोककळा पसरली होती. याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संपादन - ज्योती देवरे

हेही वाचा > धक्कादायक! रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईंकाकडून रुग्णालयाची तोडफोड....काय घडले नेमके? सीसीटिव्हीतून उघड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girls drowns in lake on Rakshabandhan day nashik marathi news