esakal | गिरणा धरण ७७ टक्के भरले; सलग दुसऱ्या वर्षी 'ओव्हरफ्लो'ची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

girna dam.jpg

पावसाळा संपायला अजून महिना बाकी आहे. गिरणा धरण पाणलोट क्षेत्रातील हरणबारी, केळझर ही धरणे ओव्हरफ्लो आहेत. तर चणकापूर, पुनंद व नाग्या-साक्या ही धरणे ९० टक्के भरली आहेत. त्यामुळे यंदाही गिरणा धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

गिरणा धरण ७७ टक्के भरले; सलग दुसऱ्या वर्षी 'ओव्हरफ्लो'ची शक्यता

sakal_logo
By
गोकुळ खैरनार

नाशिक : (मालेगाव) उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत जास्त जलसाठवण क्षमता असलेल्या गिरणा धरणात आतापर्यंत १६ हजार ७२९ दशलक्ष घनफूट साठा झाला आहे. धरण ७७ टक्के भरले आहे. वाढता जलसाठा पाहता सलग दुसऱ्या वर्षी धरण खवय्ये व पर्यटकांना खुणावत आहे.  

गिरणा धरण ७७ टक्के भरले

गिरणा धरणावर मालेगाव शहरासह जळगाव जिल्ह्यातील लहान-मोठ्या १६४ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. याशिवाय चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, पारोळा, मालेगाव, धुळे आदी भागांतील सुमारे ७० हजार हेक्टर जमिनीला गिरणाच्या पाण्याचा लाभ होतो. गिरणा हे उत्तर महाष्ट्रातील सर्वांत मोठे धरण असून, ते प्रामुख्याने कसमादेतील धरणांवर अवलंबून आहे. यंदा हरणबारी व केळझर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भरले. पुनंद व चणकापूर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस रुसला होता. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने दोन्ही धरणे ९० टक्के जलसाठ्यावर नियंत्रित केली आहेत. पंधरा दिवसांपासून चणकापूर व पुनंद या दोन्ही धरणांतून पाणी सोडल्यामुळे गिरणा धरणातील साठा वाढण्यास मदत झाली. सध्या ठेंगोडा बंधाऱ्यातून दोन हजार ९४० क्युसेक वेगाने पाणी गिरणा नदीत वाहत आहे. गिरणा धरणाची साठवण क्षमता २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट आहे. यात तीन हजार दशलक्ष घनफूट मृतसाठा असतो. 

गिरणा दहाव्यांदा होणार ओव्हरफ्लो? 

गिरणा धरणात १९६९ पासून जलसाठा भरण्यास सुरवात झाली. बांधणीनंतर पाचव्या वर्षी १९७३ मध्ये ते प्रथमच ओव्हरफ्लो झाले होते. त्यानंतर १९७६, १९८०, १९९४, २००४, २००५, २००६, २००७ व २०१९ असे नऊ वेळा धरण भरले. २०१५ मध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने धरणात केवळ तीन ते चार हजार दशलक्ष घनफूट साठा होता. यंदा धरण भरण्याची चिन्हे आहेत. 

हेही वाचा > गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता

गिरणा धरण पाणलोट क्षेत्रातील पाचही प्रमुख धरणे भरल्यात जमा आहेत. त्यामुळे आणखी महिनाभरात गिरणा ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. गिरणाचा लाभ ७० हजार हेक्टर शेतीला होतो. धरण भरल्यास रब्बीचे क्षेत्रही वाढू शकेल. - हेमंत पाटील, उपविभागीय अभियंता, गिरणा धरण  

हेही वाचा >  धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ

संपादन - किशोरी वाघ