यंत्रमाग नव्हे अर्थकारणाचा बूस्टर डोसच...रोज तब्बल 'इतक्या' कोटींची उलाढाल!

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 July 2020

पॉलिस्टर कापड व रंगीत साडीला काहीच मागणी नाही. दोन आठवड्यांत मराठवाडा भागात एकही साडी गेली नसल्याचे येथील रंगीत साडी निर्मात्यांनी सांगितले. येथील यंत्रमागावर प्रामुख्याने ३६ ते ३९ पन्ह्याचे ग्रे कापड तयार केले जात आहे. ग्रे कापड प्रक्रियेसाठी प्रामुख्याने पाली, बालोत्रा येथे जात आहे. 

नाशिक : (मालेगाव) कोरोना संसर्गामुळे देशातील विविध शहरांतील यंत्रमाग व्यवसाय ठप्प आहे. देशभरातील यंत्रमाग बंद असताना शहरातील शंभर टक्के यंत्रमाग २४ तास सुरू आहेत. त्यामुळे येथून रोज सुमारे दीड कोटी मीटर कापडनिर्मिती होत असून, प्रतिमीटर एक रुपया नफा याप्रमाणे शहरातील यंत्रमाग व्यवसायात रोज इतक्या कोटीची उलाढाल होत आहे. यामुळे दोन महिन्यांच्या काळातील लॉकडाउनची कसर भरून निघत आहे. 

शहरातील अर्थकारणाला बूस्टर डोस 

शहरातून रोज सुमारे ५० ट्रक तयार ग्रे कापड बालोत्रा, पाली, अहमदाबाद, जोधपूर, कच्छ येथे जात आहे. त्यामुळे शहरातील अर्थकारणाला बूस्टर डोस मिळाला आहे. राज्यातील भिवंडी, इचलकरंजी, नागपूर, विटा, सोलापूर, धुळे येथील यंत्रमागही अद्याप बंद असल्याने शहरातील यंत्रमागावर निर्मिती होणाऱ्या ग्रे (कॉटन) कापडाला देशात सर्वत्र जोरदार मागणी आहे. यामुळे यापूर्वी जे ३० टक्के यंत्रमागधारक पॉलिस्टर कॉटन मिक्स (पीसी) कापडनिर्मिती करत होते, त्यातील २० टक्के यंत्रमागधारकांनी आपला मोर्चा ग्रे कापड निर्मितीकडे वळविला आहे. यामुळे शहरात रोज सरासरी एक ते सव्वा कोटी मीटर तयार होणाऱ्या कापडाने दीड कोटी मीटरपर्यंतचा टप्पा गाठला आहे. रोज सुमारे दीड कोटी मीटर कापडनिर्मिती होत असून, प्रतिमीटर एक रुपया नफा याप्रमाणे शहरातील यंत्रमाग व्यवसायात रोज दीड कोटीची उलाढाल होत आहे.

दोन शिफ्टचे यंत्रमाग तीन शिफ्टमध्ये सुरू 

एका यंत्रमागावर आठ तासांत ३० ते ३५ मीटर कापड तयार होते. दोन शिफ्टमध्ये चालणारे यंत्रमाग तीन शिफ्टमध्ये सुरू आहे. सध्या ग्रे कापड १७ ते २० रुपये मीटर याप्रमाणे जात आहे. यापूर्वी हाच दर १३ ते १४ रुपये मीटर होता. एकीकडे ग्रे कापडाला सुगीचे दिवस असताना पीसी, रोटो, केंब्रीज व रंगीत साडीनिर्मिती करणाऱ्या यंत्रमागधारकांना मोठ्या मंदीचा सामना करावा लागत आहे. पॉलिस्टर कापड व रंगीत साडीला काहीच मागणी नाही. दोन आठवड्यांत मराठवाडा भागात एकही साडी गेली नसल्याचे येथील रंगीत साडी निर्मात्यांनी सांगितले. येथील यंत्रमागावर प्रामुख्याने ३६ ते ३९ पन्ह्याचे ग्रे कापड तयार केले जात आहे. ग्रे कापड प्रक्रियेसाठी प्रामुख्याने पाली, बालोत्रा येथे जात आहे. 

सुताचे दर स्थिर असल्याने मोठा दिलासा

या कापडापासून मोठ्या प्रमाणावर गाऊन, खोळ, पायजमा, कफनसाठीचे कापड आदी उत्पादने साकारली जात आहेत. मास्क निर्मितीसाठीही ग्रे कापडाला मोठी मागणी आहे. गेल्या काही दिवसांत केरळमध्ये गाऊनसाठी येथील ग्रे कापड व्यापक प्रमाणात गेल्याचे यंत्रमाग मालकांनी सांगितले. यातच सुताचे दर स्थिर असल्याने यंत्रमागधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंत्रमाग जोमाने सुरू झाल्याने यंत्रमाग कामगार, हमाल, ट्रान्स्पोर्ट चालक-मालक, गाठ वाहणारे, सायजिंगमधील कामगार, मुकादम, तीनचाकी रिक्षाचालक अशा अनेकांना काम मिळाले आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! पहाटेची वेळ...गर्भवती मादीने अचानक पुलावरुन मारली उडी...असं काय घडलं?

देशातील यंत्रमाग व्यवसाय ठप्प असताना मालेगावची ग्रे कापडाची स्थिती सर्वोत्तम आहे. शहरातील विविध १५ ट्रान्स्पोर्टमधून रोज सुमारे ५० ट्रक तयार ग्रे कापड गाठी प्रोसेसिंगसाठी जात आहे. यात ४० ट्रक बालोत्रा येथे, सात ट्रक पाली येथे, तर चार ट्रक अहमदाबाद, जोधपूर, कच्छ या भागात जात आहेत. - अशोक गुप्ता संचालक, महालक्ष्मी ट्रान्स्पोर्ट, मालेगाव 

शहरातील ग्रे कापडनिर्मिती जोरात आहे. सध्या मीटरमागे ८० पैसे ते एक रुपया मिळत आहे. उत्तर प्रदेश सरकारने लघु घरगुती उद्योगांना दोन हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. राज्य शासनाने यंत्रमाग, प्रोसेसिंग, वर्कशॉप यासह अन्य लघुउद्योगांना सहज, सुलभ पद्धतीने भांडवल उपलब्ध करून दिले पाहिजे. - युसूफ इलियास अध्यक्ष, पॉवर लुम कृती समिती, मालेगाव  

हेही वाचा > 'या गुन्ह्यातून सुटकेसाठी मी तुझी मदत करतो'...पण त्याच्याबद्दल्यात..

(संपादन - किशोरी वाघ)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Golden days for powerloom in Malegaon city, daily turnover of around Rs 1.5 crore nashik marathi news