शाब्बास 'गुगल'! 'तो' ठरतोय गुन्हेगारांचा कर्दनकाळ; कामगिरीचं होतयं कौतुक

अरुण मलाणी
Saturday, 12 September 2020

शाब्बास गुगल! अहो पण हा गुगल म्‍हणजे लोकप्रिय सर्ज इंजिन नव्‍हे, तर पोलिसांच्‍या पथकातील श्‍वान आहे. यापूर्वीही त्याने अनेक गुन्‍हे उघडकीस आणण्यात मदत केली आहे. जिल्हा पोलीस दलातील श्वान गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत.

नाशिक :  शाब्बास गुगल! अहो पण हा गुगल म्‍हणजे लोकप्रिय सर्ज इंजिन नव्‍हे, तर पोलिसांच्‍या पथकातील श्‍वान आहे. यापूर्वीही त्याने अनेक गुन्‍हे उघडकीस आणण्यात मदत केली आहे. जिल्हा पोलीस दलातील श्वान गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरत आहेत.

तो ठरतोय गुन्हेगारांचा कर्दनकाळ

बनावट चावीचा वापर करून घरातून ९० हजारांची चोरी झाल्‍याचा गुन्‍हा गेल्या शुक्रवारी (ता.४) घडला होता. मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनंतर आठवडाभरात या घटनेतील संशयित गुगलच्‍या सहाय्याने पोलिसांनी ताब्‍यात घेतला. खोडेनगर येथील बापू नाना कॉलनीतील किनारा अपार्टमेंटमधील फ्लॅटमधून शुक्रवारी बनावट चावीचा वापर करत चोरट्यांनी घरातून ८० हजारांची रोकड व दहा ग्रॅम सोन्‍याची पोत असा एकूण ९० हजारांचा ऐवज लांबविला होता. याप्रकरणी अन्‍सारी इसमोहम्‍मद अजमुल्‍ला यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी गुन्‍हे शाखेतील श्‍वान (गुगल) ला पाचारण केले. संशयिताचा येण्या-जाण्याच्‍या मार्गाचा माग गुगलने यशस्‍वरीत्‍या काढला. यातून हा गुन्‍हा उघडकीस आला असून, घटनेतील संशयित मुजफर अमिन शेख यास अटक केली. त्‍याच्‍याकडून चोरीस गेलेला ६४ हजारांचा माल हस्‍तगत केला. या कामगिरीबद्दल मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी गुगलचे अभिनंदन केले. गुन्ह्याची उकल करण्याकरिता वरिष्ठ निरीक्षक ए. आर. जाधव यांच्‍या मार्गदर्शनाखाली श्‍वान पथकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बी. बी. मोरे, श्‍वान हस्‍तक गणेश कोंडे, अरुण चव्‍हाण यांनी प्रयत्न केले.  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

नाशिक पोलिसांची मानही उंचावली

गुन्हा घडताच तात्काळ हजर होऊन आरोपींचा मागोवा काढत तपास करण्यात श्वानांचा मोठा हातभार आहे. विशेष म्हणजे गुन्हे शोधण्यात नाशिकच्या श्वानांनी अव्वल स्थानही पटकावलेले आहे. यामुळे नाशिक पोलिसांची मानही उंचावली आहे. अगदी स्त्रीभ्रूण हत्येपासून ते खुनाच्या आरोपी, अनेक महत्वांच्या गुन्ह्यात श्वानांची भूमिका अग्रस्थानी राहिलेली आहे. श्वानांचे काम सध्या वेगवान सुरू असल्याने समाधान आहे.

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google dog searched Burglary suspect nashik marathi news