सख्खा भाऊच झाला वैरी! शेतीच्या पैशांसाठी भावावरच झाडल्या गोळ्या; कुटुंबियांचा आक्रोश

अजित देसाई
Wednesday, 7 October 2020

तालुक्यातील वडझिरे येथील ग्रामपंचायतच्या देविदास नामदेव कुटे (34) यांची मंगळवारी (ता. 6) रात्री अकरा वाजेच्या सुमारास राहत्या घराच्याबाहेर पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सूत्रे फिरवत पहाटे 4 वाजेच्या सुमारास मारेकरी असणाऱ्या सख्ख्या भावासह एका शार्पशूटरला ताब्यात घेतले.

नाशिक : (सिन्नर) तालुक्यातील वडझिरे येथील ग्रामपंचायतच्या देविदास नामदेव कुटे (34) यांची मंगळवारी (ता. 6) रात्री अकरा वाजेच्या सुमारास राहत्या घराच्याबाहेर पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सूत्रे फिरवत पहाटे 4 वाजेच्या सुमारास मारेकरी असणाऱ्या सख्ख्या भावासह एका शार्पशूटरला ताब्यात घेतले. वाचा काय घडले नेमके?

अशी आहे घटना

देविदास कुटे हे गीते वस्ती परिसरात आई, पत्नी व मुलांसह राहत होते. त्यांचा भाऊ संशयित आरोपी कृष्णा उर्फ गणेश नामदेव कुटे (रा. उद्योग भवन, सिन्नर) याने शेतीच्या वादातून दोघा भावांमध्ये असलेल्या मतभेदामुळे ही हत्या केल्याचा प्रकार निष्पन्न झाला. मंगळवारी (ता. 6) रात्री नेहमीप्रमाणे कुटे कुटुंबीय झोपले असताना सव्वा अकरा वाजेच्या सुमारास दरवाजा ठोठावला आवाज आला. कुटे यांच्या पत्नी सरिता (29) यांनी दरवाजा उघडल्यावर दोघेजण बाहेर उभे असल्याचे दिसले. त्यांनी आम्ही कोंबड्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावरील माणसे आहोत असे सांगत आजूबाजूच्या काही पोल्ट्रीधारकांची नावे विचारली. त्यांचा फोन बंद असल्याने दुसरा कोणाचा नंबर असेल तर द्या त्यांनी म्हटल्यावर सरिता यांनी पती देविदास यांना आवाज देत घराबाहेर बोलवले. आपला काळ बनून समोर असलेल्या सख्ख्या भावाला देखील त्यांनी ओळखले नाही. पत्नीला घरातून मोबाईल आणायला सांगत देविदास ओट्याचा खाली उतरून लघुशंकेसाठी गेले. ही संधी साधत कृष्णासोबत असलेल्या प्रवीण शंकर वाकचौरे (28) याने त्याच्या जवळील गावठी पिस्तुलाने देविदास यांच्या मांडीवर पहिली गोळी झाडली. हा क्षण सविता यांनी पाहिल्यावर भीतीपोटी त्यांनी दरवाजा बंद करून घेतला व आरडाओरड करायला सुरुवात केली. याच दरम्यान खाली पडलेल्या देविदास यांच्या गळ्याजवळ दुसरी गोळी झाडली. तर कपाळाच्या मधोमध झाडलेल्या तिसऱ्या गोळीने त्यांचा जीव घेतला.

पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली

दोघेही हत्या करत अंधाराचा फायदा घेत पसार झाले. सरिता यांच्या ओरडण्याचा आवाजाने बाजूच्या वस्तीवरील रहिवाशी मदतीला धावत आले. घटनेची माहिती मिळताच रात्र गस्तीवर असणारे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ लावणे यांच्यासह पोलिस पथक वडझिरे येथे घटनास्थळी पोहोचले. आजूबाजूला शोध घेतला असता एका संशयिताच्या चपला पडलेल्या दिसल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना या घटनेची माहिती देत पोलीस निरीक्षक रहाटे यांनी नाशिक येथील श्वानपथक, ग्रामीण पोलिसांच्या विशेष शाखेला सतर्क केले. दरम्यान घटनास्थळी आलेल्या ग्रामस्थांनी कृष्णा याला फोनवरू माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री साडे बारा वाजेपर्यंत त्याचा मोबाईल फोन स्विच ऑफ होता. त्याचा फोन सुरू झाल्यावर घडला प्रकार सांगण्यात आला. त्यावेळेस त्याची प्रतिक्रिया स्पीकर फोनद्वारे ऐकून पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. घटनास्थळी श्वान पथकाने काही अंतरापर्यंत माग काढला. तोपर्यंत पोलीस अधीक्षक श्री. पाटील, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे हेदेखील दाखल झाले. 

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

भावाचा काटा काढल्याची कबुली

मयत देविदास व कृष्णा यांच्यात शेतीच्या वाटपावरून वाद होते. कृष्णा याच्यावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी त्याच्या हिश्श्याची काही जमीन विकण्यात आली होती. या जमिनीचे पूर्ण पैसे द्यावेत यासाठी दोघा भावांमध्ये वाद सुरू होते. आपण जमिनीचे पैसे हातात देणार नाही तर असलेले कर्ज फेडून उरलेले पैसे तुझ्या नावे बँकेत ठेवतो असे देविदास यांचे म्हणणे होते. मात्र कृष्णा त्यात तयार नव्हता. त्याने प्रवीण वाकचौरे या साथीदारस सोबत घेऊन भावाचा काटा काढल्याची कबुली पहाटे चार वाजेच्या सुमारास पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत केले. सकाळी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर वडझिरे येथे देविदास यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Sevak shot dead in Vadzire, brother arrested nashik marathi news