बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट

अरुण मलाणी
Tuesday, 9 February 2021

सकाळी सुमारे सहा ते आठ तास अभ्यास शिकवणीत करत होतो. घरी गेल्‍यावर सुमारे दोन तास असा दिवसभरात एकूण दहा तास अभ्यास करायचो. कुटुंबीय, संघवी यांच्‍यासह बहीण सेजलने दिलेल्‍या प्रोत्‍साहनामुळे ही कामगिरी करू शकलो.

नाशिक : आठवड्याभरापूर्वीच सीए अंतिम परीक्षेच्‍या निकालात नाशिकच्‍या सेजल सुराणा हिने यशाला गवसणी घालताना सनदी लेखापाल (सीए) होण्याचे स्‍वप्‍न पूर्ण केले. त्‍यातच तिचा लहान भाऊ प्रसन्न सुराणा याने सोमवारी (ता. ८) जाहीर झालेल्‍या सीए फाउंडेशन निकालात यश मिळविताना बहिणीच्‍या पाठोपाठ सीए होण्याच्‍या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘सकाळ’ शी संवाद साधताना प्रसन्नने आपल्‍या यशाचे गमक सांगितले. 

एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट
प्रसन्नचे वडील डॉ. प्रफुल्‍ल सुराणा आणि आई डॉ. सुनीता सुराणा हे सुराणा दांपत्‍य वैद्यकीय व्‍यवसायात असून, जनरल प्रॅक्‍टिस करतात. त्‍यांच्‍या कुटुंबात तशी सीएची पार्श्वभूमी नसली तरी एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट लागला आहे. लेक सेजल सीए झाली असून, प्रसन्नदेखील त्‍या दिशेने वाटचाल करतोय. राष्ट्रीय क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकासह यशस्‍वी झालेल्‍या प्रसन्नने आपल्‍या वाटचालीची माहिती दिली. 

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

एकूण दहा तास अभ्यास
प्रसन्न म्‍हणाला, की आदर्श विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर बीवायके महाविद्यालयातून अकरावीला प्रवेश घेतला. या वेळी सीए मयूर संघवी यांच्‍या माइंड स्‍पार्क येथे सीए शिक्षणक्रमाच्‍या तयारीसाठी शिकवणी लावली. फेब्रुवारी २०२० च्‍या इयत्ता बारावीच्‍या परीक्षेत ९३ टक्‍के गुण मिळवीत उज्‍ज्‍वल यश संपादित केले. दरम्‍यान, सीए परीक्षेतील यशाबद्दल प्रसन्न म्‍हणाला, की सकाळी सुमारे सहा ते आठ तास अभ्यास शिकवणीत करत होतो. घरी गेल्‍यावर सुमारे दोन तास असा दिवसभरात एकूण दहा तास अभ्यास करायचो. कुटुंबीय, संघवी यांच्‍यासह बहीण सेजलने दिलेल्‍या प्रोत्‍साहनामुळे ही कामगिरी करू शकलो.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

कसून अभ्यास केल्‍यास हमखास यश

अनेक विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे स्‍वप्‍न बघतात. त्‍यांना सल्‍ला देताना प्रसन्न म्‍हणाला, की जिद्द आणि चिकाटीच्‍या जोरावर यश मिळविता येऊ शकते. परीक्षेत यश मिळेपर्यंत प्रयत्‍न केले पाहिजे. तसेच कसून अभ्यास केल्‍यास हमखास यश मिळते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great performance of brother following sister nashik marathi news