प्लॅन फसला! चोरीछुपे घरात लपविले होते 'घबाड'; पोलिसांकडून मोठा खुलासा

रोशन खैरनार
Sunday, 27 September 2020

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळेच गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याची चर्चा आहे. गुटखा विक्री करून भावी पिढीला बरबाद करणाऱ्या या गुटखा किंगवर मोका लावण्याची मागणी होत आहे. याबाबत मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक संदीप घुगे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नाशिक : (सटाणा) गुजरातमधून महाराष्ट्रात गुटखा आणून काळ्या बाजारात त्याची खुलेआम विक्री करणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी त्यांचा घरी सापळा रचून छापा टाकला. अन् सापडले मोठे घबाड. यात मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांचा अंदाज व्यक्त केला. नेमका प्रकार काय?

अशी आहे घटना

तरुण पिढीचे दिवसेंदिवस व्यसन करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातच गुजरातमधून गुटखा आणून काळ्या बाजारात त्याची खुलेआम विक्री करणारी टोळी बागलाण तालुक्यात कार्यरत आहे. शुक्रवारी (ता.२५) पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सटाणा पोलिसांनी शहरातील ऊर्दू शाळेजवळील दत्तनगरमध्ये फिरोज मुक्तार तांबोळी (वय ३३) याच्या घरी सापळा रचून छापा टाकला. या छाप्यात एक लाख २५ हजार ८०७ रुपयांचा गुटखा पकडला. तर ठेंगोडा (ता. बागलाण) शिवारातील खैरनाला येथे सुनील दगा पवार (३०) यांच्या मळ्यात छापा टाकून ९७ हजार ६२९ रुपयांचा प्रतिबंधित पान व सुगंधी तंबाखू असा एकूण दोन लाख २३ हजार ४३६ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. 

दोन लाख २३ हजार ४३६ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात

पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली असून, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांना शहर व तालुक्यात गुटख्याचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी एकूण दोन लाख २३ हजार ४३६ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पथकात पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, किरण पाटील, पोलिस उपनिरीक्षक राहुल गवई, पुंडलिक डंबाळे, अजय महाजन, प्रकाश शिंदे, रवींद्र भामरे, जिभाऊ बागूल, जितेंद्र पवार आदी कर्मचारी सहभागी झाले होते. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

अन्न प्रशासन विभाग उदासीन 

कसमादे पट्ट्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत असताना अन्न प्रशासन विभाग मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. अवैध गुटखा विक्रीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असताना ही कारवाई सटाणा पोलिसांना करावी लागत आहे. गुटखा किंग आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळेच गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याची चर्चा आहे. गुटखा विक्री करून भावी पिढीला बरबाद करणाऱ्या या गुटखा किंगवर मोका लावण्याची मागणी होत आहे. याबाबत मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक संदीप घुगे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutka worth Rs 12 lakh seized in Satana nashik marathi news