'गुटखा अन्‌ मटका विक्री व साठा करणाऱ्यांची गय नाही' - IGP प्रताप दिघावकर

2pratap_20dighavkar_201_1.jpg
2pratap_20dighavkar_201_1.jpg

नाशिक : (मालेगाव) युवा पिढी देशाचे बलस्थान आहे. काही तरुण व्यसन व नशेच्या आहारी गेले आहेत. ही खेदजनक बाब आहे. गुटख्याचे व्यसनही घातक तसेच विविध आजारांना आमंत्रण देणारे आहे. त्यामुळे नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत आगामी काळात गुटखा अन्‌ मटका दिसणार नाही, असा आपण संकल्प केल्याचे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी शनिवारी (ता. २६) 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

विक्री व साठा करणाऱ्यांची गय नाही

श्री. दिघावकर म्हणाले, की बळीराजाच्या समस्यांना व फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे मिळवून देण्याला आपण प्राधान्य दिले आहे. दोन आठवड्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तब्बल ५५ लाखांहून अधिक रक्कम मिळवून दिली. याचे समाधान असले तरी आपण येथेच थांबणार नाही. आगामी काळात गुटखा व मटक्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. गुटखाविक्री व साठा करणारे कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही. श्री. दिघावकर यांच्या विशेष पोलिस पथकाने शनिवारी (ता. २६) शहरातील सोयगाव बाजारपेठेतील अनिल पिंगळे (वय ४८) यांच्या श्रीराम कॉम्प्लेक्स भागातील दुकानावर छापा टाकून प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूचा १३ लाख ४८ हजार २५० रुपयांचा साठा जप्त केला. 

छुप्या पद्धतीने लपवून गुटखा आणला जात होता

श्री. पिंगळे यांच्याकडे टेम्पोमधून विविध गोण्यांमध्ये छुप्या पद्धतीने लपवून हा गुटखा आणला जात होता. तसेच त्यांच्याकडे मोठा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शनिवारी (ता.२६) दुपारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक संदीप पाटील, जमादार राजेंद्र सोनवणे, पोलिस शिपाई हजारे, उमाकांत खापरे, दीपक ठाकूर, अमोल भामरे, नितीन सपकाळ आदींच्या पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, राजेंद्र सूर्यवंशी, दिलीप सोनवणे यांच्या सहकार्याने ही कारवाई केली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. मालेगावला धुळे व दोंडाईचा येथील पथकाने छापा टाकला. यातच सर्वकाही मेख लक्षात आली.

गुटखाविक्री व अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले

स्थानिक काही अधिकारी गुटख्याचा व्यापार करणाऱ्या प्रमुख विक्रेत्यांशी संधान साधून असल्याची माहिती मिळाल्यावरूनच विशेष पथकाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यापूर्वी कॅम्प पोलिस ठाणे हद्दीत किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यातच संबधित यंत्रणा धन्यता मानत असताना श्री. दिघावकर यांच्या कारवाईने गुटखाविक्री व अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com