अखेर पाच वर्षांनी सुटला तिढा..."त्या'' धोकादायक पुलावर पडणार हातोडा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

चांदवड शहरातून वाहणाऱ्या लेंडी नदीवरील एकलव्य नगरातील पुलाला अखेर मंजुरी मिळाल्याने अस्तित्वात असलेल्या धोकादायक पुलावर हातोडा पडून येथे नवीन पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री संत गाडगेबाबा चौक प्रभाग सहाच्या नगरसेविका कविता उगले यांनी दिली. 

नाशिक : (गणूर) चांदवड शहरातून वाहणाऱ्या लेंडी नदीवरील एकलव्य नगरातील पुलाला अखेर मंजुरी मिळाल्याने अस्तित्वात असलेल्या धोकादायक पुलावर हातोडा पडून येथे नवीन पूल उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री संत गाडगेबाबा चौक प्रभाग सहाच्या नगरसेविका कविता उगले यांनी दिली. 

अखेर मंजुरी मिळाली

शनिमंदिराकडून येणारी लेंडी नदी एकलव्यनगराच्या पाठीमागून वाहत जाऊन पुढे गणूरच्या दिशेने जाते. या नदीवर एकलव्यनगरात असलेला पूल काही वर्षांपासून धोकादायक बनला होता. नेमिनाथ जैन, मविप्रसह जिल्हा परिषदांच्या शाळांना जोडणारा हा पूल शाळकरी मुलांच्या दृष्टीने तितकाच महत्त्वाचा होता. पुलावर पडलेले भगदाड व दोन्ही बाजूला नसलेल्या कठड्यांमुळे येथे कायम छोटे-मोठे अपघात घडायचे. पावसाळ्यात तर अनेकदा पूर आला, की काही काळासाठी पूल बंद व्हायचा. अशात मुस्लिम वस्तीत एखादा मृत्यू झाल्यास पूल पार करून कब्रस्तानमध्ये जाणे गैरसोयीचे व्हायचे. या सर्व समस्या बघता येथे नवीन पूल करावा, या मागणीसाठी नगरसेविका कविता उगले आग्रही होत्या. त्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. 

पुलास प्रशासकीय मान्यता

नव्याने स्थापित झालेल्या नगर परिषदांसाठी मूलभूत सुविधा योजनेंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी या पुलास प्रशासकीय मान्यता दिली आहे. 37 लाख 84 हजार 807 रुपये खर्चून पुलाचे काम 12 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पुलाच्या कामाचे भूमिपूजन सोशल डिस्टन्स पाळून नगराध्यक्षा रेखाताई गवळी, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, नगरसेविका मीनाताई कोतवाल, अल्ताफ तांबोळी, विलास पवार, छबू उगले यांच्या हस्ते झाले. मुख्याधिकारी अभिजित कदम, शेषराव चौधरी, सत्यजित गायकवाड, अनिल कुरे, अश्‍पाक खान, नंदू कोतवाल, आसिफ शेख, पप्पू हांडगे, नितीन फंगाळ, शिवसेना शहरप्रमुख संदीप उगले, दीपक शिरसाट उपस्थित होते. 

हेही वाचा > हुश्श...'त्या' आरोग्य कर्मचाऱ्याच्या संपर्कातील नातेवाइकांचे रिपोर्ट निगेटिव्ह!

गैरसोयी टळणार 

-शाळकरी मुले-मुली सुरक्षित शाळेत जातील 
-पूर आला म्हणून कब्रस्तान जाण्यासाठी थांबण्याची गरज नाही 
-गणेशविसर्जन मार्ग सुरक्षित होणार 
-छोटे-मोठे अपघात टळणार

हेही वाचा > धक्कादायक! शेडनेटमध्ये घुसलेला बिबट्या अचानक जेव्हा शेतकर्‍यासमोर येतो...अन् मग

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hammer on that dangerous bridge, success in the pursuit of corporator Kavita Ugale nashik marathi news