आंब्याचा राजा राहिला दाराशी...यंदा हापूसची विदेशवारी नाहीच!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मे 2020

मागील वर्षी 679 टन आंबा निर्यातीमुळे यंदा एक हजार टन निर्यातीचे उद्दिष्ट होते. मात्र, ऐन हंगामात लॉकडाउनमुळे येथे आंब्यावर प्रक्रियाही झाली नाही आणि विमानसेवाही बंद असल्याने यंदा आंब्याची ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिकावारी हुकली. 

नाशिक : (लासलगाव) येथील भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटरतर्फे नियंत्रित केल्या जाणाऱ्या येथील कृषक सेंटरमधून दर वर्षी विकिरण प्रक्रिया केलेला हापूस अमेरिकेत जातो. मागील वर्षी 679 टन आंबा निर्यातीमुळे यंदा एक हजार टन निर्यातीचे उद्दिष्ट होते. मात्र, ऐन हंगामात लॉकडाउनमुळे येथे आंब्यावर प्रक्रियाही झाली नाही आणि विमानसेवाही बंद असल्याने यंदा आंब्याची ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिकावारी हुकली.

20 कोटींचा फटका

लासलगावहून दर वर्षी एप्रिल ते जुलैदरम्यान प्रक्रिया होऊन अमेरिका व ऑस्ट्रेलियात आंबा पाठविला जातो. यंदा मात्र मोसमाच्या सुरवातीलाच कोरोना विषाणूमुळे जगभरात लॉकडाउन सुरू झाल्याने अमेरिकेतील निरीक्षक अद्याप या केंद्रात पर्यवेक्षणासाठी आले नसल्याने आता आंबा निर्यातीची शक्‍यता धूसर आहे. 2019 च्या हंगामात कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील उत्पादकांनी निर्यातीसाठी 29 हजार 99 प्लॉटची नोंदणी केली होती, तर ऑस्ट्रेलियामध्ये दहा टन आंबा निर्यात करण्यात आला होता. या प्रकल्पातून हापूस, केशर, दशहरी, बेंगणपल्ली, लंगडा यावर प्रक्रिया करून निर्यात केली जाते. 

आंब्यावर प्रक्रिया करून होते निर्यात

मागील वर्षी जेट एअरवेजने फ्रान्सच्या मदतीने कार्गो वाहतूक सुरू केली होती. यातून मुंबईहून फळे व भाजीपाला निर्यात सुरू असल्याने त्या माध्यमातून आंब्याची रोज दोनशे टन निर्यात होत होती. पण जेट एअरवेजची सेवा बंद केल्यानंतर अन्य कंपन्यांनी निर्यातीचे दर 15 ते 20 टक्के वाढविल्याने त्याचाही फटका निर्यातीला बसला होता. 31 ऑक्‍टोबर 2002 ला तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी "कृषक'चे उद्‌घाटन केले होते. सुरवातीला हा प्रकल्प फक्त कांद्यासाठी केला होता. मात्र, येथे आता आंब्यावर प्रक्रिया करून निर्यात केली जात आहे. 2015 नंतर सध्या हा प्रकल्प ऍग्रोसर्ग कंपनीतर्फे कार्यान्वित केला जात आहे. 

आंब्यासह अन्नपदार्थावर प्रक्रिया 

येथील केंद्रात फळे, अन्नपदार्थ, मसाल्याचे पदार्थ यावर गॅमा किरणांचा मारा करून विकिरण केले जाते. या प्रकल्पात प्रामुख्याने कांदा, आंबा यावर विकिरण प्रक्रिया केली जाते. कांदा, बटाटे यांना कोंब येऊ नयेत म्हणून प्रक्रिया केली जाते, तर गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये यातील कीड नष्ट करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. केळी, आंबे या फळांची टिकवणक्षमता लांबविण्यासाठी आणि आंब्यातील "स्टोन विविल' या जातीची कीड नष्ट करण्यासाठी प्रक्रिया केली जाते. 

हेही वाचा > चोवीस तास बंदोबस्त असूनही 'त्याने' मारली शाळेतून दांडी?...धक्कादायक प्रकार

या केंद्रांमधून निर्यात झालेला आंबा (टनामध्ये) 

2008....... 275, 2009....... 121 
2010.... 96, 2011.... 85 
2012.... 210, 2013... 281 
2014... 275, 2015... 328 
2016.. 567, 2017... 550 
2018.. 591, 2019.... 679  

हेही वाचा > धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hapus will not be sent abroad this year due to lockdown nashik marathi news