हरणबारी ९४ टक्के भरले; नागरिक मोसमच्या पहिल्या पुराच्या प्रतिक्षेत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

हरणबारी धरणावर मोसम काठावरील अनेक पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. धरणात निर्णायक जलसाठा झाल्याने या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळणार आहे.​

मालेगाव : हरणबारी धरण ९४ टक्के भरले असून, एक-दोन दिवसांत ओव्हरफ्लो होईल. धरण भरल्यानंतर मोसम नदीला पूरपाणी येईल. याचा लाभ मालेगाव व बागलाण तालुक्यांतील मोसम खोऱ्याला होणार आहे. शिवाय जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले गिरणा धरण भरण्यासही मदत होईल. 

हरणबारी धरणावर मोसम काठावरील अनेक पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. धरणात निर्णायक जलसाठा झाल्याने या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळणार आहे. हरणबारी धरणाची क्षमता एक हजार १६६ दशलक्ष घनफूट आहे. मंगळवारी (ता. ११) सकाळी आठपर्यंत धरणात एक हजार ९० दशलक्ष घनफूट जलसाठा झाला होता. धरण ९४ टक्के भरले असून, ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. धरणाला गेट (दरवाजे) नाहीत. त्यामुळे ओव्हरफ्लो होताच सांडव्यावरून पाणी मोसम नदीपात्रात वाहण्यास सुरवात होते. मोसमच्या पहिल्या पुराची आस मोसम खोऱ्यातील नागरिकांना लागली आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

मालेगाव व बागलाण तालुक्यात पाऊस

या वर्षी मालेगाव व बागलाण या दोन्ही तालुक्यांवर वरुणराजा खूश आहे. त्यामुळे खरिपाची पिके जोमात आहेत. तूर्त पाणीटंचाई नाही. मोसमला तीन-चार पूर आल्यास मोसम खोऱ्यातील विहिरींना पाणी उतरण्यास मदत होते. शिवाय नदीपात्रात असलेले बंधारे भरतात. त्याचा फायदा जनावरांना पिण्यासाठी होतो. गिरणा धरणातील जलसाठा प्रामुख्याने मोसम व गिरणा नदीला येणाऱ्या पूरपाण्याने वाढतो. गेल्या वर्षी पूर्ण भरलेल्या गिरणा धरणात आधीचा जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे दोन महिन्यांत आतापर्यंत धरण पन्नास टक्के भरले आहे. चणकापूर व पुनंद धरण पाणलोट क्षेत्रात यंदा पाऊस रुसला आहे. त्यामुळे गिरणेला अजून म्हणावा तसा पूर आलेला नाही. हरणबारी भरल्यानंतर पूरपाण्याचा फायदा गिरणा धरणाला होईल. 

ओव्हरफ्लो होणारे धरण 
डोंगर व पर्वतरांगांचा साज असलेले हरणबारी धरणाचे वैशिष्ट्ये म्हणजे धरण प्रत्येक वर्षी हमखास भरते. कितीही दुष्काळी परिस्थिती असली तरी पावसाळ्या अखेर का होईना धरण ओव्हरफ्लो होते. बहुतांशी वेळा धरण ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात भरत आले आहे. उन्हाळ्यात मिळणाऱ्या तीन आवर्तनातून मोसम खोऱ्याला मोठा दिलासा मिळतो. 

हेही वाचा >  थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haranbari is 94 per cent full overflow soon nashik marathi news