मुख्याध्यापिकाच करायची शालेय पोषण आहारातील तांदूळ चोरी; पालकांमध्ये तीव्र संताप

school 2.jpg
school 2.jpg
Updated on

चांदवड (नाशिक) : चांदवड येथील श्री नेमीनाथ जैन संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने शालेय पोषण आहारातील पंधरा क्विंटलचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले आहे. संस्थेच्या मॅनेजमेंट कमिटीने मुख्याध्यापिका जयश्री गोळेचा लाख रंगेहाथ पकडून तात्काळ निलंबित केले आहे. इतका गलेलठ्ठ पगार असतानाही या मुख्याध्यापिकेने गरीबांच्या मुलांच्या घशातील तांदूळ चोरल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून या मुख्याध्यापिकेसह संबंधितांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

पंधरा क्विंटल तांदूळ शाळेत न आणता परस्पर घेतला

नेमीनाथ जैन संस्थेच्या अनुदानित श्री नेमीनाथ जैन प्राथमिक विद्यामंदिर शाळेत एकूण आठशे चौतीस विद्यार्थी शिकतात. या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. सद्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर या सर्व विद्यार्थ्यांना पोषण आहार व शिजवता वाटप केला जातो. नेहमीप्रमाणे पोषण आहारातील तांदळाचा पुरवठा करणाऱ्या तिरुपती सप्लायर एजन्सीचे वाहन क्रमांक एम एच 14 ए एच 6910 हे चालक इमरान सय्यद याने संस्थेच्या या प्राथमिक शाळेत या पोषण आहारातील तांदूळ आणला. त्याने पन्नास किलो वजनाच्या एकाहत्तर गोण्या उतरवल्या वास्तविक नियमानुसार पन्नास किलो वजनाच्या एकशे एक गोणी तांदूळ शाळेत पुरवठा करावयास हवा होता. असं असतानाही या मुख्याध्यापिका जयश्री गोळेचा यांनी सदर चालकाला एकशे एक गोणी शाळेत या एजन्सीने पुरवठा केल्याची पोहोच पावती दिली. यावरून या मुख्याध्यापिकेने चालकाशी संगनमत करून पोषण आहारातील पंधरा क्विंटल तांदूळ शाळेत न आणता परस्पर उतरवून घेतल्याचे स्पष्ट झाले.

एका विद्यार्थ्याला चार ते साडेचार किलोच तांदूळ वाटप

ही कुणकुण संस्थेच्या कार्यकारी मंडळाला लागल्यानंतर ही मुख्याध्यापिका विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करीत असतानाच धाड टाकली. यावेळी एका विद्यार्थ्याला सहा किलो तांदळाचे वाटप करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात एका विद्यार्थ्याला चार ते साडेचार किलोच तांदूळ वाटप करीत असल्याचे निदर्शनास आले. एकतर पंधरा क्विंटल तांदूळ अगोदरच ढापलेल्या या मुख्याध्यापिकेचा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तोंडातून आणखी दोन किलो तांदूळ आपल्या घशात घालण्याचा प्रकार पाहून संस्थेने या मुख्याध्यापिकेला तात्काळ निलंबित केले आहे. या मुख्याध्यापिकेने आपल्या कार्यकाळात आणखी काही गैरव्यवहार केले आहेत का हे तपासण्यासाठी संस्थेने चौकशी सुरू केली आहे.

प्राथमिक चौकशीत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री गोळेचा या दोषी आढळून आलेल्या आहेत. चौकशी सुरू असून चौकशीअंती संबंधित संस्थेस मुख्याध्यापिकेविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात नियमानुसार आवश्यक ते निर्देश देऊन कारवाईच्या सूचना दिल्या जातील. - राजेंद्र निकम, गटशिक्षणाधिकारी, चांदवड
 

तांदळाचा अपहार करणा-या या मुख्याध्यापिकेला संस्थेने तात्काळ निलंबित केले आहे. मुख्याध्यापिकेच्या विरोधात विद्यार्थी व पालकांच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानूसार कारवाई करण्यात येईल. देशभर नावलौकिक असणा-या आमच्या संस्थेत गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही. - झुंबरलाल भंडारी, जॉंईन्ट सेक्रेटरी, नेमीनाथ जैन संस्था, चांदवड


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com