नाशिक अन् मालेगावच्या कोंबड्यांमध्ये ‘नो बर्ड फ्लू’! भोपाळ प्रयोगशाळेचा अहवाल

महेंद्र महाजन
Friday, 22 January 2021

नाशिकमध्ये चिकन महोत्सव घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेमुळे काहीसे थांबण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशातच, कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू नसल्याचे स्पष्ट झाल्याने उत्पादकांमधील महोत्सवासाठीचा उत्साह दुणावला आहे. 

नाशिक : जिल्ह्यातील ब्रॉयलर कोंबड्यांच्या उद्योगासाठी दिलासादायक घटना घडली आहे. मालेगावमधील मृत ४० आणि नाशिकच्या एका कोंबडीचे नमुने तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला असून, सर्व नमुने ‘निगेटिव्ह’ आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये ब्रॉयलर कोंबड्या उत्पादकांच्या माध्यमातून होणाऱ्या चिकन महोत्सवाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. 

कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू नसल्याचे स्पष्ट 

राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी विविध शहरांमध्ये बर्ड फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर ग्राहकांमधील भीती कमी होण्यासाठी चिकन महोत्सव घेण्याची तयारी दर्शविली आहे. पुण्यात सिंह यांच्या उपस्थितीत चिकन महोत्सव झाला आहे. तसेच पेणमध्ये शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी सात ते नऊ या वेळेत चिकन महोत्सव होत आहे. राज्यातील ब्रॉयलर कोंबड्या उत्पादकांनी चिकन महोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे. नाशिकमध्ये चिकन महोत्सव घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेमुळे काहीसे थांबण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशातच, कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू नसल्याचे स्पष्ट झाल्याने उत्पादकांमधील महोत्सवासाठीचा उत्साह दुणावला आहे. 

गावठी कोंबड्यांचा मृत्यू 

मालेगावमधील गावठी कोंबड्यांचा मृत्यू उत्पादनाच्या अनुभवाच्या अभावामुळे झाल्याची बाब पशुवैद्यकीय विभागाच्या निदर्शनास आली आहे. कमी भावात मिळतात म्हणून ५५ दिवसांच्या कोंबड्या पालनासाठी आणण्यात आल्या होत्या. मात्र त्या विश्‍वासू माणसाकडून घेतल्या गेल्या नव्हत्या ही बाब या विभागाच्या तपासणीत आढळून आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात ५४ स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात ३२ कावळे आणि २२ इतर पक्षी आहेत. त्यासंबंधाने पशुवैद्यकीय विभागाने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून परिसरातील पक्ष्यांचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेकडे तपासणीला पाठविण्यास सुरवात केली आहे. ही प्रक्रिया तीन महिने सुरू ठेवली जाणार आहे. 

हेही वाचा > खासगी सावकारी वादातून अपहरणानंतर अमानुष कृत्य; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

पशुवैद्यकीय विभागात नियंत्रण कक्ष 

बर्ड फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर पशुवैद्यकीय विभागाच्या नाशिकमधील अशोक स्तंभ भागातील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती उपसंचालक डॉ. बाबूराव नरवाडे यांनी दिली. ते म्हणाले, की २८ शीघ्र पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांच्या मुख्य प्रशिक्षकांचे प्रशिक्षण झाले आहे. त्यांनी तालुकानिहाय पथकातील सदस्यांना प्रशिक्षण दिले आहे. शिवाय ‘मॉकड्रिल’ करण्यात आले आहे. ही पथके जिल्ह्यातील १५ तालुक्यांत कार्यरत आहेत.  

हेही वाचा > मध्यरात्री जेव्हा चोर लागतो नागरिकांच्या हाती; प्लॅन तर फसलाच अन् नंतर फक्त दे दणा दण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A heartening news for broiler hen industry in district nashik marathi news