अतिवृष्टीने खरीप पिकांचे कोट्यावधींचे नुकसान; सलग तिसऱ्या वर्षी शेतकरी संकटात

माणिक देसाई  
Tuesday, 29 September 2020

तालुक्यातील बहुतांश भागात सोयाबीन सोंगणीला आले आहे. त्यासाठी काही जण पाऊस उघडण्याची वाट पाहत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने शेतात साठवून ठेवलेले पीक बाहेर काढणेदेखील अवघड झाले आहे.

नाशिक/निफाड : तीन वर्षांपासून दुष्काळ आणि अतिवृष्टीशी शेतकरीराजा सामना करीत आहे. चार महिन्यांपासून धो-धो कोसळणारा पाऊस आणि डोळ्यादेखत होणारी पिकांची नासाडी यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे गणित कोलमडले असून, या अवकाळी पावसाने निफाड तालुक्यातील खरीप पुरा धुतला जाण्याची शक्यता आहे. द्राक्षासह काढणीस आलेल्या खरिपाच्या पिकाची पुरती धुळधाण झाली आहे. 

उभ्या असलेल्या सोयाबीनला मोड फुटले

निफाड तालुक्यात खरिपाची प्रमुख पिके असलेल्या सोयाबीन, मका, कांदे, भाजीपाला या पिकांचीही नासाडी झाली आहे. काही ठिकाणी तर पावसाच्या पाण्यात संपूर्ण पिकेच वाहून गेले आहेत. गोदाकाठ भागातील सायखेडा, शिंगवे, चांदोरी, दिंडोरी, शिवरे व निफाड परिसरातील जळगाव कोठुरे, नैताळे, सोनेवाडी, कोळवाडी, उगाव परिसरात तसेच खडकमाळेगाव परिसरातील खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनला मोड फुटले आहेत. अनेक ठिकाणी शेतात पाणी आहे. त्याचा निचरा होत नसल्याने अनेकांनी सडलेले सोयाबीनचे पीक उपटून टाकले आहे. गेल्या वर्षी साडेतेरा हजार हेक्टरवरील सोयाबीनला अतिवृष्टीत जलसमाधी मिळाली होती. यंदाही मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मागचे नैसर्गिक दुष्टचक्र तीन वर्षांपासून सुरूच आहे. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
 

शेतकरी संकटात सापडला

तालुक्यातील बहुतांश भागात सोयाबीन सोंगणीला आले आहे. त्यासाठी काही जण पाऊस उघडण्याची वाट पाहत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने शेतात साठवून ठेवलेले पीक बाहेर काढणेदेखील अवघड झाले आहे. या पिकांना शेतातच मोड येण्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गोदावरीसह तिच्या नद्यांना आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतातून पाणी वाहिले. भरीस भर पुन्हा एकदा पावसाने डोके वर काढल्याने सोयाबीन, मका, कांदे, पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ कांद्याची रोपेदेखील खराब झाली आहेत. सततच्या पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

 

चार महिने झाले तरी पावसाळा उघडण्याचे नाव घेत नाही, अशा परिस्थितीत झालेल्या पिकांची नासाडी त्यामुळे होणारे नुकसान यातून कसा मार्ग काढायचा, याची चिंता भेडसावत आहे. सरकारने लक्ष घालून त्यातून मार्ग काढायला हवा; अन्यथा निफाड तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त होतील. 
- शिवा पाटील-सुरासे , माजी प्रभारी सभापती, पंचायत समिती, निफाड 

चार महिन्यांपासून निफाडच्या बागायती पट्ट्याला पावसाचा फटका बसला आहे. प्रशासनाने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. शेतकरी उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना त्याला मदत करायला हवी. तातडीने पंचनामा करावा. निफाडच्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.  - विकास रायते  

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain damaged crops in nashik district marathi news