इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वरमध्ये २४ तासांमध्ये अतिवृष्टी; धरणसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ

महेंद्र महाजन
Saturday, 15 August 2020

जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात वरुणराजा हजेरी लावत असून, शुक्रवारी (ता. १४) सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासांत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वरमध्ये अतिवृष्टी झाली. चोवीस तासांमध्ये धरणसाठ्यात दोन टक्क्यांची वाढ झाली आहे.

नाशिक : जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात वरुणराजा हजेरी लावत असून, शुक्रवारी (ता. १४) सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासांत इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वरमध्ये अतिवृष्टी झाली. चोवीस तासांमध्ये धरणसाठ्यात दोन टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, दारणामधून नऊ हजार ९५६, भावलीतून ९४८, नांदूरमध्यमेश्‍वरमधून १६ हजार ८६५, हरणबारीमधून एक हजार ६४३, पुनंदमधून ८१८, माणिकपूंजमधून २५०, असा एकूण ३० हजारांहून अधिक क्यूसेक विसर्ग सुरू आहे. 

धरणसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ; ३० हजार क्यूसेक विसर्ग 
मध्यम आणि मोठ्या अशा २४ प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी ऑगस्टच्या मध्याला ८७ टक्के जलसाठा होता. आज ५३ टक्के झाला असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ६७ टक्के जलसाठा झाला आहे. जायकवाडी धरणातील जलसाठा दिवसेंदिवस वाढत असल्याने यंदा जलसाठा ६५ टक्क्यांच्या पुढे पोचण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मराठवाड्याला नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी देण्याची आवश्‍यकता भासणार नाही. मात्र, जिल्ह्यातील धरणसाठा वाढवण्यासाठी गेल्या चोवीस तासांसारखा पाऊस किमान आठवडाभर होण्याची आवश्‍यकता आहे.

आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासांत नोंदवण्यात आलेला तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा (कंसात आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी) : नाशिक- ३९ (६७.२१), इगतपुरी- १२० (७५.५७), दिंडोरी- १८ (५४.३३), पेठ- ५३.२ (३९.१७), त्र्यंबकेश्‍वर- ११० (४०.४९), मालेगाव- ३२ (१३१.३३), नांदगाव- २२ (१०४.२१), चांदवड- २५.७ (६८.६७), कळवण- २८ (५७.२२), बागलाण- ३० (१२७.८२), सुरगाणा- ६२.२ (४०.३९), देवळा- ९८.७० (९१.९६), निफाड- १६.६ (७६.८५), सिन्नर- १८ (१११.९९), येवला- १४ (८९.७२). 

PHOTOS : देश स्वातंत्र्य झाला.. पण आम्ही पारतंत्र्यातच? स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व दिनीच विहिरीत खाटेवर बसून आंदोलन

मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज 
इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान विभागातर्फे जिल्ह्यात शनिवार (ता. १५)पासून पाच दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शनिवारी (ता. १५) ३९, रविवारी (ता. १६) ४३, सोमवारी (ता. १७) २९, मंगळवारी (ता. १८) ४१ आणि बुधवारी (ता. १९) ४३ मिलिमीटर पावसाचा अंदाज आहे.  

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in Igatpuri, Trimbakeshwar in twenty four hours nashik marathi news