जिल्ह्यात रुग्णांसाठीची हेल्पलाइन हेल्पलेस?...लोकप्रतिनिधीकडून तक्रारींचा पाढा

MAHA_VIKAS.jpg
MAHA_VIKAS.jpg

नाशिक : प्रशासनातील अधिकारी ऐकत नाही, चालढकल करतात, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बाधितांसाठी असलेली हेल्पलाइन हेल्पलेस असल्याची तक्रार शनिवारी (ता. 11) सर्वपक्षीय बैठकीस उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींनी केली. कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि उपाययोजना याविषयी शनिवारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. 

अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक परिस्थितीत

तक्रारी ऐकल्यानंतर पालकमंत्री भुजबळ म्हणाले, की अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात आहे. लोकांच्या उपजीविकेचा प्रश्‍न गंभीर होत आहे. अन्नधान्य देणे पुरेसे नाही. हाताला काम मिळण्याची गरज आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांना निरंतर सक्रिय रहावे लागेल. कोरोनाशी लढताना केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचना पाळण्याची आवश्‍यकता आहे. खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांनी या काळात नागरिकांना समजून सांगून परिस्थिती नियंत्रणात कशी राहील, याची काळजी घ्यावी. सायंकाळी सात ते पहाटे पाचपर्यंत लॉकडाउन कडक करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. रुग्णांची तपासणी संख्या वाढविल्याने रुग्णांची संख्या वाढणार आहे. मात्र लवकरच यावर आपण नियंत्रण मिळवू शकणार आहोत. जिल्हा रुग्णालयात लवकरच टेस्टिंग लॅब सुरू करण्यात येत आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत अतिरिक्त बेडची व्यवस्था सुरू असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले. 

काय केल्यात तक्रारी...

- प्रशासनाकडून असहकार्य 
- रुग्णांना दाखल करून घेण्यास चालढकल 
- अधिकाऱ्यांकडून फोन न उचलणे 
- पुन्हा लॉकडाउनबाबत भूमिका काय 

प्रशासकीय यंत्रणेविषयी तक्रारी

घटक पक्षातील लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय यंत्रणेविषयी तक्रारी मांडल्या. बैठकीस कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, हिरामण खोसकर, सुहास कांदे, सरोज आहिरे, माजी आमदार जयवंत जाधव, शिरीष कोतवाल, दीपिका चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, सुनील पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सीमंतिनी कोकाटे, राजाराम पानगव्हाणे आदी उपस्थित होते. 

मिशन बिगेन अगेन

घटक पक्षातील लोकप्रतिनिधींच्या तक्रारी एकल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सगळ्यांना सबुरीचा सल्ला देत, कोरोनामुळे जागतिक महासत्तापासून तर लहान-लहान गावाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. सगळीकडे नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशी बिकट परिस्थिती हाताळण्यासाठी लोकप्रतिनिधी नात्याने आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे. किंबहुना "मिशन बिगेन अगेन' शासनाची ही भूमिका तळागाळात पोचविण्याचा सल्ला दिला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com