राज्यात फटाके कारखान्यांचे उत्पादन सुरू; दीपोत्सवात भरारीची आशा

fatake.jpg
fatake.jpg

नाशिक : (मालेगाव) कोरोनामुळे राज्यातील फटाके उद्योगाला मोठा फटका बसला. लग्नसराई, यात्रा-जत्रा, राष्ट्रपुरुषांच्या जयंती, सण-उत्सव असे मार्च ते जून या चार महिन्याचे मोठे सीझन वाया गेले. यामुळे आगामी दीपोत्सवाच्या आशेने हा उद्योग पुन्हा भरारी घेऊ पाहत आहे. खानदेशसह महाराष्ट्रातील बहुतांश फटाके कारखान्यांचे उत्पादन सुरू झाले आहे. 

मार्च ते जून हे उद्योगाचे सीझन कोरोनामुळे वाया

कोरोनाच्या सावटाखालीच यंदा दिवाळी साजरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्योजक लहान आकाराचे फटाकेच तयार करीत आहेत. यात टिकली डबी, आपटी बाँब, भुईचक्कर, पेन्सिल, फुलझाड, सुरसुरी, रॉकेट, छोटे लोंगी फटाके, चक्र, नागगोळी, कलर धूर, कलर कोटी, बंदूक, लेस, रंगीत काडीपेटी आदी फटाक्यांचा समावेश आहे. फटाके हा बारमाही चालणारा व्यवसाय होत आहे. मार्च ते जून हे उद्योगाचे सीझन कोरोनामुळे वाया गेले. अलीकडे प्रत्येक विवाहात फटाके उडविण्याची प्रथा आहे. निवडणुकांमध्येही फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते. 

फटाके सुकविण्यासाठी भाद्रपदाचे ऊन फायदेशीर

दीपोत्सव हा या व्यवसायाचा आत्मा आहे. दिवाळीसाठी जूनपासूनच उत्पादन सुरू होते. साधारणत: रक्षाबंधन व गणेशोत्सवानंतर फटाक्यांचे बुकिंग सुरू होते. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत फक्त २५ टक्के बुकिंग झाली आहे. कोरोनामुळे फटाके व्यावसायिक मालाची मर्यादीतच निर्मिती करीत आहेत. खानदेशमधील फटाक्यांचे उत्पादन सुरू होऊन महिना झाला. फटाके सुकविण्यासाठी सध्याचे भाद्रपदाचे ऊन फायदेशीर ठरत आहे. 

शिवकाशीत धूम 

तमिळनाडूतील शिवकाशीत पाचशेपेक्षा अधिक फटाक्यांचे कारखाने आहेत. वर्षभर हे कारखाने सुरू असतात. संपूर्ण देशात येथून फटाके विक्री होतात. शिवकाशीत फटाक्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू आहे. त्यामुळे मोठ्या फटाक्यांसाठी अनेकांकडून यंदा शिवकाशीला पसंती दिली जाणार आहे. पाचशे ते दहा हजारांपर्यंत फटाक्यांची माळ, १२ शॉट ते २४० शॉट असे मोठे फटाके, लक्षवेधी फटाके, मोठ्या आवाजाचे फटाके बाँब आदी तीनशेहून अधिक प्रकारचे फटाके यंदा मागविण्याचे नियोजन काही कारखानदार व घाऊक व्यापारी करीत आहेत. 

सहा महिन्यांपासून फटाक्यांची विक्री व उत्पादन बंद आहे. कारखानदार व व्यावसायिकांकडे माल शिल्लक आहे. त्यामुळे व्यावसायिक अडचणीत आहेत. दिवाळीपर्यंत परिस्थिती सुधारेल या आशेवर फटाक्यांचे उत्पादन सुरू केले आहे. शासनाने फटाका उद्योगाच्या अडचणी समजून घेऊन त्यांना सहकार्य करावे. कोरोना परिस्थितीमुळे यंदा फटाक्यांचे भाव स्थिर राहतील. 
- गोविंद शिरोळे संचालक, मालती फायर्सवर्क्स, पारोळा 

कोरोनामुळे फटाके व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. सध्या दुकाने सुरू झाली असली तरी ग्राहक नाहीत. या व्यवसायावर हजारो नागरिक अवलंबून आहेत. दिवाळीत चांगला व्यवसाय होईल, अशी अपेक्षा आहे. - प्रसाद पाटील, अवधूत लक्ष्मी फायरवर्क्स, मालेगाव  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com