
अवकाळी पावसाच्या चार दिवसांच्या हजेरीमुळे कृषिपंढरी नाशिक जिल्ह्यातील फलोत्पादन क्षेत्राला अडीच हजार कोटींचा फटका बसला आहे. पावसाच्या पाण्यामुळे झालेले नुकसान आणि बाजारभावाच्या कृषी अभ्यासकांनी केलेल्या आकडेमोडीतून ही स्थिती पुढे आली आहे.
नाशिक : अवकाळी पावसाच्या चार दिवसांच्या हजेरीमुळे कृषिपंढरी नाशिक जिल्ह्यातील फलोत्पादन क्षेत्राला अडीच हजार कोटींचा फटका बसला आहे. पावसाच्या पाण्यामुळे झालेले नुकसान आणि बाजारभावाच्या कृषी अभ्यासकांनी केलेल्या आकडेमोडीतून ही स्थिती पुढे आली आहे. यात सर्वाधिक नुकसान एक हजार ८८० कोटींपर्यंतचे आहे. शिवाय कांदा, भाजीपाला, आंब्याचेही अवकाळीने नुकसान केले आहे.
द्राक्षांचे नुकसान पावणेदोन हजार कोटींच्या पुढे
कृषी विभागाने केलेल्या पाहणीत मात्र चार हजार हेक्टरच्या पुढे जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अंदाज पोचू शकलेला नाही. फलोत्पादन उत्पादकांशी केलेल्या चर्चेतून नुकसानीची नेमक्यापणाने माहिती मात्र पुढे आली आहे. द्राक्षांच्या ३० हजार एकराला अवकाळीने दणका दिला आहे. एका एकरात सर्वसाधारपणे सात टन निर्यातक्षम उत्पादन घेतले जाते. आताचा निर्यातीसाठी मिळणारा बाजारभाव किलोला शंभर रुपयांपर्यंत आहे. मात्र त्याचवेळी द्राक्षांचे तडकलेले मणी काढून किलोला १५ रुपयांपर्यंतच्या भावात शेतकरी द्राक्षे एकतर बेदाणा उत्पादनासाठी अथवा वाइन उत्पादनासाठी देऊ शकतात. याबाबींची गोळाबेरीज आणि वजाबाकी केल्यावर द्राक्षांचे नुकसान डोळ्यापुढे उभे राहते.
हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात
भाजीपाल्याला ३०० कोटींची झळ
भाजीपाल्याचे चार हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यातील पंचवीस टक्के क्षेत्रावरील भाजीपाल्याच्या झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांनी साठ कोटींहून अधिकची झळ बसली आहे. त्याचवेळी टोमॅटोचे १६ हजार हेक्टर क्षेत्र असून, शेतकरी हेक्टरी २५ टन उत्पादन घेतात. त्यातील तीस टक्के क्षेत्रावरील टोमॅटोच्या नुकसानीची झळ २४० कोटींपर्यंत पोचली आहे. दरम्यान, कांद्याच्या रोपांचे कृषी विभागाच्या पाहणीनुसार सप्टेंबरमध्ये दोन हजार ४६७, तर ऑक्टोबरमध्ये २४९ हेक्टरचे नुकसान झाले होते. एकीकडे ही रोपे उपलब्ध न झाल्याने २७ हजार एकरवर उन्हाळ कांद्याची लागवड होऊ शकलेली नसताना शेतकऱ्यांना सात कोटींचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. आता उन्हाळ कांद्याचे क्षेत्र एक लाख हेक्टरपर्यंत पोचले असून, दोन हजार हेक्टरचा फटका पाच कोटींपर्यंत पोचला आहे. याशिवाय लेट खरिपाच्या कांद्याचे क्षेत्र ७८ हजार हेक्टर असून, त्यातून प्रत्येक एकरातून शेतकऱ्यांना २५ टन कांद्याचे उत्पादन अपेक्षित होते. हा कांदा वीस टक्क्यांपर्यंत भिजल्याने शेतकऱ्यांना शंभर कोटींवर पाणी सोडावे लागले आहे. अशी एकूण कांदा उत्पादकांची झळ ११२ कोटींपर्यंत पोचली आहे.
हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा
आंब्याला शंभर कोटींचा दणका
पेठ तालुक्यात एक हजार १८० आणि सुरगाण्यात दोन हजार हेक्टरवर आंब्याची लागवड झाली आहे. एका हेक्टरमधून शेतकरी १५ टनापर्यंत उत्पादन घेतात. या आंब्याचा अवकाळी पावसाने मोहर गळून गेल्याने ३० टक्क्यांपर्यंत आंब्याचे उत्पादन घटणार आहे. बाजारभावाशी तुलना केल्यावर आंबा उत्पादक आदिवासींना शंभर कोटींपर्यंत दणका बसल्याचे चित्र पाहावयास मिळते.