बिबट्याचा उच्छाद पाच वर्षांपासून सुरुच; वनविभाग आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार?

विजय पगार
Saturday, 21 November 2020

मानवी रक्ताला चटावलेला बिबट्याने बळी घेण्याच्या घटना वाढत असताना वन विभागाचे अधिकारी लोकांशी संवादही साधत नाहीत. कार्यरत असलेले वन अधिकारी आणि कर्मचारी अप्रशिक्षित असून, नेमके कोण वनरक्षक आहेत याची नागरिकांना माहिती नाही, आदी तक्रारी मांडल्या. 

इगतपुरी (नाशिक) : तालुक्यात गेल्या पाच वर्षांपासून नरभक्षक बिबट्याचा संचार वाढला आहे. आता थेट माणसांवर हल्ले सुरू झाले असून, चार महिन्यांत चार चिमुरड्यांचा बळी गेला आहे. आधरवड येथील तीन वर्षे, पिंपळगाव मोर येथील सहावर्षीय बालकाचा नरभक्षक बिबट्याने बळी घेतला आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्याच्या दहशतीने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. 

नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करा

इगतपुरीच्या दुर्गम भागातील बिबट्याच्या दहशतीविरोधात वन विभागाने युद्धपातळीवर प्रशिक्षित वन अधिकाऱ्यांचे पथक बोलवून नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राज्य युवाध्यक्ष लकी जाधव यांनी केली. पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकजकुमार गर्ग यांना आज यासंदर्भात निवेदन देत, याप्रश्‍नी आक्रमक आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा दिला. 

मानवी रक्ताला चटावलेला बिबट्याने बळी घेण्याच्या घटना 

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नरभक्षक बिबट्या प्रकरणी कोणतीही कडक भूमिका घेतल्याचे दिसत नाही. आठवड्यातच नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यासाठी उपाययोजना अपेक्षित असताना निष्क्रियतेमुळेच बालकांचे बळी जात आहे. मानवी रक्ताला चटावलेला बिबट्याने बळी घेण्याच्या घटना वाढत असताना वन विभागाचे अधिकारी लोकांशी संवादही साधत नाहीत. कार्यरत असलेले वन अधिकारी आणि कर्मचारी अप्रशिक्षित असून, नेमके कोण वनरक्षक आहेत याची नागरिकांना माहिती नाही, आदी तक्रारी मांडल्या. 

बिबट्याचे हल्ले 

२०१६ : साकूर, माणिकखांब, अस्वली स्टेशन येथे शेतकरी व कामगार जखमी 
२०१७ : मेंगाळवाडीत युवकावर हल्ला, चिंचलेखैरेत शेळ्यांचा फडशा, महिंद्र कंपनीत प्रवेश 
२०१८ : पिंपळगाव घाडगा येथे पोल्ट्री फार्ममधील ५०० कोंबड्या मृत्युमुखी 
२०१९ : आशा-किरणवाडी येथे भरदिवसा शेतकऱ्यावर हल्ला 
२०२० : चिंचलेखैरे, घोटी खुर्द येथे शेळ्या व वासरांचा फडशा 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बिबट्याचा बंदोबस्तासाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने वन विभाग काम करीत आहे. तक्रारी आणि निवेदनाबाबत चौकशी करून निर्णय घेतला जाईल. - पंकजकुमार गर्ग (उपवनसंरक्षक नाशिक पश्चिम)  

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How many more victims will forest department wait for? nashik marathi news