Lockdown4.0 : कमी उत्पन्नात घर कसे चालवाल?लॉकडाउनमुळे संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटली

Lockdown4.0 : कमी उत्पन्नात घर कसे चालवाल?लॉकडाउनमुळे संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटली

नाशिक : कोरोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी योजलेल्या लॉकडाउनच्या उपायामुळे संपूर्ण जगाची आर्थिक घडी विस्कटली असून, कुणाचा रोजगार गेला, तर कुणाच्या पगारात कपात झाली आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे अर्थकारण बिघडले आहे. या परिस्थितीत अधिक घाबरून न जाता तिला तोंड देत कमी खर्चामध्ये घर चालविण्याची आता प्रत्येकाला सवय लावून घ्यावी लागणार आहे. ही तारेवरची कसरत करताना वैद्यकीय व जीवनावश्‍यक गरजांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.

कौटुंबिक बजेट कोलमडले
घर, गाडी आणि विम्याचे हप्ते भरण्यास शासनाने सवलत दिली असल्याने ग्राहकांनी कर्जफेडीऐवजी तूर्तास जीवनावश्‍यक गरजांवर लक्ष दिले पाहिजे. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगाराची अजूनही वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे त्यांचे कौटुंबिक बजेट कोलमडले आहे. खासगी व कॉर्पोरेट सेक्‍टरमधील कामगारांना या आर्थिक संकटाचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर लहान व्यावसायिकही या आर्थिक संकटात सध्या भरडले जात असल्यामुळे आर्थिक नियोजनाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पगारच नसल्याने कर्जाचे हप्ते भरणार कसे, ही विवंचना ओळखून शासनानेही हप्ते भरायला तूर्तास सवलत दिली आहे. त्यामुळे कमी पैशात घर चालविताना पेट्रोल खर्च, मोबाईल रिचार्ज, टीव्हीचे बिल, दूध बिल, किराणा, भाजीपाला, औषधे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

काय करावे अन्‌ काय करू नये?
1. खर्चाचा अंदाज बांधा, मगच पाऊल उचला.
2. जीवनशैलीत बदल करा. शक्‍यतो साधीच असावी. यासाठी कुटुंबातील सर्वांशी मोकळेपणाने संवाद साधा.
3. पती-पत्नीने एकत्र बसून आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे, हे एकत्र लिहून काढावे व बजेट बनवावे.
4. मुलांना कमी फी असलेल्या, पण चांगले शिक्षण देणाऱ्या शाळेत टाकावे.
5. महागडे कपडे व खाण्यापिण्यावरील अनावश्‍यक खर्च टाळावा.
6. कमी दर्जाची समजली जाणारी कामे स्वीकारण्यास लाज बाळगू नका.
7. नम्रतेचा गुण विकसित करावा.
8. नेहमी समाधानी राहावे.
10. या कठीण काळात नकारात्मक विचार मनात आणू नयेत.

आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात....

महिलांनी काय करावे?
1. सध्या घरात काय आवश्‍यक आहे, यापेक्षा काय आवश्‍यक नाही याची यादी बनवावी.
2. आवश्‍यक नसलेल्या गोष्टीवर रेष ओढून ती यादीतून वगळावी.
3. प्राथमिकता असलेल्या घटकाला प्राधान्य द्यावे.
4. घरात रोज जेवणात काय बनवावे हे आयत्या वेळी न ठरवता, आठवड्याचे पदार्थ, भाज्या नक्की कराव्यात, जेणेकरून घरातील उपलब्ध साहित्य व बाहेरून कोणते साहित्य विकत आणायचे याची सांगड घालून खर्च कमी करता येईल.
-प्रा. दीपाली चांडक, अध्यक्षा, विज्डम एक्‍स्ट्रा


जीवनावश्‍यक गोष्टींना प्राधान्य द्यावे
1. लोकांनी जीवनावश्‍यक गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे.
2. व्यक्तीच्या कुटुंब जीवनचक्रात भाजीपाला, किराणा, दूध, गोळ्या-औषधे, सिलिंडरचा खर्च आहे. त्यामुळे इतर गोष्टी काही काळ बाजूला ठेवून जीवनावश्‍यक गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे.
3. शासनाने बॅंका व विमा हप्ते भरण्यासाठी सूट दिलेली आहे. त्याचा आधार घेतला पाहिजे.
-शरद जाधव, सनदी लेखापाल

हेही वाचा > धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार

घरातील ज्येष्ठांच्या गरजा ओळखा
1. आपली बचत सध्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी जीवनावश्‍यक वस्तूंवर वापरली पाहिजे.
2. चैनी वस्तूंवरचा खर्च कमी होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
3. बॅंकांनी कर्जदारांना हप्ते भरण्यासाठी मोठा दिलासा दिला आहे.
3. ज्येष्ठ नागरिकांच्या गोळ्या, औषधांपासून तर कुटुंबातील लहान मुलांच्या जीवनावश्‍यक गरजा ओळखून कुटुंबाने प्राधान्यक्रम ठरवावा.
-अरुण घोडेराव, निवृत्त व्यवस्थापक, बॅंक ऑफ महाराष्ट्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com