काय सांगता! रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ‘रानभाज्यां’ची होतेय हातोहात विक्री; वाचा वैशिष्ट्ये...

अरुण मलाणी
Monday, 10 August 2020

आदिवासींचे रानवैभव असलेल्या रानभाज्यांमध्ये प्रथिनांसह पोषणद्रव्ये अन् जीवनसत्व असल्याने त्यातून रोगप्रतिकारशक्ती वाढते. नेमकी हीच माहिती शहरवासीयांपर्यंत एव्हाना पोचली असल्याने जागतिक आदिवासी गौरवदिनाचे औचित्य साधून कृषी विभागातर्फे भरवण्यात आलेल्या महोत्सवातील रानभाज्या हातोहात खपल्या.​

नाशिक : आदिवासींचे रानवैभव असलेल्या रानभाज्यांमध्ये प्रथिनांसह पोषणद्रव्ये अन् जीवनसत्व असल्याने त्यातून रोगप्रतिकारशक्ती वाढते. नेमकी हीच माहिती शहरवासीयांपर्यंत एव्हाना पोचली असल्याने जागतिक आदिवासी गौरवदिनाचे औचित्य साधून कृषी विभागातर्फे भरवण्यात आलेल्या महोत्सवातील रानभाज्या हातोहात खपल्या. कृषिमंत्री दादा भुसे यांनी रानभाज्यांच्या विक्री व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला असून, शहरांमध्ये रानभाज्या विक्रीसाठी कायमस्वरूपी जागा मिळणार आहे. संभाजी चौकातील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात भरलेल्या रानभाज्या महोत्सवाचे उद्‌घाटन श्री. भुसे यांच्या हस्ते झाले.

३६७ रानभाज्यांचे प्रकार
आगामी काळात शहरात कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करेल, अशी ग्वाही श्री. मांढरे यांनी दिली. महोत्सवात ३६७ रानभाज्यांचे प्रकार उपलब्ध आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात रानभाज्यांच्या पाककृती यूट्यूबसारख्या माध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, असेही श्री. मांढरे यांनी सांगितले. श्री. क्षीरसागर, प्रा. फरांदे, श्रीमती बनसोड, श्री. बनकर, श्री. टकले. श्री. पडवळ यांनी संवाद साधला. विमल आचारी, मारुती पवार, मधुकर बांगारे, मनोहर चौधरी, सीताराम चौधरी, अनिल पवार, आदर्श शेती शेतकरी गटातील शेतकरी आणि के. के. वाघ उद्यान महाविद्यालयाच्या सहाय्यक प्रा. अश्विनी चोथे यांचा श्री. भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत महोत्सवाची सांगता झाली.
 

रानभाज्या आणि त्यांची वैशिष्ट्ये
- तांदूळजा : तोंडाची चव गेलेल्यांना भाजी देतात, ताप कमी होतो, भूक बळावते
- आघाडा : भरपूर कॅल्शिअम आणि मधुमेहावर उपयुक्त, मूत्र-कफ-त्वचा विकारात वापरतात
- कोनफळ : उंबराची लापशी करतात
- टाकळा अथवा तरोटा : त्वचारोगावर उपयुक्त, अग्निमांद्य म्हणून ओळख
- कुवाळी : पोटाच्या विकारावर गुणकारी
- शेवळ : शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही पद्धतीने भाजी केली जाते, अतिशय चविष्ट
- कळम : स्निग्धपणामुळे पोटाला थंडावा देणारी व आरोग्यकारक
- सराटे : बाळांतिणीच्या कंबरदुःखीवर उपयुक्त मानली जाते
- मायाळू : आळूवडीला पर्याय म्हणून मायाळूचा वापर
- कुडा : फुलांची व शेंगाची भाजी करतात, अनेक प्रकारच्या साथीच्या आजारांवर गुणकारी
- भोकर : फळांजी भाजी, सूप, लोणचे, खापुर्ली (केक), सरबत करतात
- करटुले : भाजी, भजी, वाळवून कोशिंबीर करतात
- भोपूड : शारीरिक ताकदीसाठी उपयुक्त, भजी, सूप, आमटी, रसभाजी अथवा सुकी भाजी करतात
- घोळ : मूळव्याध आणि अतिसारावर गुणकारी
 

हेही वाचा - थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, कृषी सभापती संजय बनकर, आमदार सरोज आहिरे, प्रा. देवयानी फरांदे, माजी आमदार हेमंत टकले, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षक प्राचार्य संजय पाटील, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, उपसंचालक कैलास शिरसाठ, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, दिलीप देवरे, कैलास खैरनार, गोकुळ वाघ आदी उपस्थित होते.

हेही वाचा > नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेतून गट शेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. शेतकरी शेतमालाचे ब्रँडिंग करू शकल्याने शेतीमालाला चांगला दर मिळेल. गट माध्यम व संस्था यांच्या माध्यमातून रानभाज्यांच्या विक्रीसाठी शहरांमध्ये कायमस्वरूपी जागा उपलब्ध केली जाईल. योजनेतून शेतीमालाला गुदाम, स्टोअरेज, कोल्ड स्टोअरेज उपलब्ध करून दिले जाईल.- दादा भुसे, कृषिमंत्री

 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immune boosters vegetables sale of ‘legumes nashik marathi news