esakal | कोरोना पाठोपाठ डेंगीचा धोका! खडकसुकेणेत नागरिकांचे आरोग्य रामभरोसे
sakal

बोलून बातमी शोधा

Increase in the number of dengue patients

दिंडोरी तालुक्यातील खडकसुकेणे ग्रामपंचायतीसह इतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द झाल्याने तेथे प्रशासक नेमले. परंतु प्रशासक ग्रामपंचायतीकडे वळूनही बघत नसल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.

कोरोना पाठोपाठ डेंगीचा धोका! खडकसुकेणेत नागरिकांचे आरोग्य रामभरोसे

sakal_logo
By
नंदकुमार दिंगोरे

नाशिक/मोहाडी : सध्या कोरोनाने अवघ्या जगाला हादरवून सोडले असून‌, त्याच्याशी लढा देताना सर्वसामान्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे.‌ कोरानाशी दोन हात करताना पोटाची खळगी भरावी कशी, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असताना खडकसुकेणे गावात सध्या डेंगीने डोके वर काढले आहे. 

नागरिकांचे आरोग्य ‘रामभरोसे’

दिंडोरी तालुक्यातील खडकसुकेणे ग्रामपंचायतीसह इतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका रद्द झाल्याने तेथे प्रशासक नेमले. परंतु प्रशासक ग्रामपंचायतीकडे वळूनही बघत नसल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. प्रशासकांना विचारणा केली असता आमच्याकडे आठ ते दहा गावे दिल्याने आम्ही प्रत्येक गावाला वेळ देऊ शकत नाही, असे उत्तर मिळत आहेत. यामुळे प्रशासक नेमलेल्या गावांमध्ये नागरिकांचे आरोग्य ‘रामभरोसे’ झाल्याचे चित्र आहे. आरोग्य यंत्रणा कामाला लागली असली तरी ग्रामपंचायतीच्या प्रशासनाकडून पाहिजे ते सहकार्य व उपाययोजना होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

प्रशासक व ग्रामसेवकांची टोलवाटोलवी

डेंगीचे रुग्ण गावात वाढत असताना फॉगिंग मशिन घेऊन ग्रामस्थांच्या आरोग्य सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावाच्या अंडरग्राउंड गटारीचे पाणी गावालगतच एका मोठ्या खड्ड्यात सोडल्याने परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक एकमेकांकडे टोलवाटोलवी करीत असले तरी प्रशासन आता तरी लक्ष देईल का? असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. गावात सध्या डेंगीचे संशयित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून, अनेक रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. ग्रामपंचायतीचे सार्वजनिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा