'महसूलवाढीसाठी स्वतंत्र, सुलभ धोरण निश्चित करणार' - राधाकृष्ण गमे

विक्रांत मते
Thursday, 17 September 2020

नाशिक जिल्ह्यातील कामकाजात डिजिटल तंत्रज्ञानावर प्रणालीचा प्रभावी वापर होत असल्याने प्रशासनाची कार्यक्षमता वाढत आहे. गेल्या दीड वर्षात कोरोना, पूरनियंत्रण, टंचाई, शेतकरी आत्महत्या, सेवा हमी, डिजिटल रिड्रेसल प्रणालीच्या अंमलबजावणीत नाशिकचे कामकाज उल्लेखनीय राहिले आहे. 

नाशिक : महसुली उत्पन्नाचे व वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, त्यासाठी नाशिक विभागस्तरावर स्वतंत्र व सुलभ धोरण निश्चित करणार असल्याचे माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. 

दीड वर्षात नाशिकचे कामकाज उल्लेखनीय

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात महसूल आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, गणेश मिसाळ, कुंदनकुमार सोनवणे, रचना पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर आदींसह उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. श्री. गमे म्हणाले, की विभागातील पाचही जिल्ह्यांचा आढावा घेतला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील कामकाजात डिजिटल तंत्रज्ञानावर प्रणालीचा प्रभावी वापर होत असल्याने प्रशासनाची कार्यक्षमता वाढत आहे. गेल्या दीड वर्षात कोरोना, पूरनियंत्रण, टंचाई, शेतकरी आत्महत्या, सेवा हमी, डिजिटल रिड्रेसल प्रणालीच्या अंमलबजावणीत नाशिकचे कामकाज उल्लेखनीय राहिले आहे. 

साधन-सुविधांच्या बळकटीकरणासाठी शाश्वत उपाययोजना

येत्या काळात मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेत आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून महसूल प्रशासनाने यशस्वी करावा, असे आवाहान केले. तसेच, कोरोना काळात महसूल वसुलीसाठी नाशिक महानगर प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रासाठी धोरण अंमलात आणण्याची योजना असून, त्यातून जिल्ह्याच्या साधन-सुविधांच्या बळकटीकरणासाठी शाश्वत उपाययोजना आखता येतील, असे सांगितले. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

डिजिटल प्रणालीवर भर 

तत्पूर्वी जिल्हाधिकारी मांढरे यांनी, जिल्ह्यातील उपक्रमांच्या माहितीचे सादरीकरण केले. सेवा हमी योजना, व्हॉट्सॲप रिड्रेसल प्रणालीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रणालीची माहिती व महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी व्यापकता वाढविण्यावर भर आहे. कोरोना नियंत्रणासाठी 'माझे कुटुंब- माझी जबाबदारी' ही मोहीम यशस्वी करण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयाने या मोहिमेद्वारे जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सांगितले.  

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Independent, easy strategy for revenue growth, Radhakrishna Game nashik marathi news