टँकरचे अर्थकारण! उन्हाळ्यात ७२ कोटीऐवजी 'इतके' लिटरच पाण्याचा वापर; वाचा सविस्तर

युनूस शेख
Monday, 14 September 2020

त्यामुळे हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्सकडून पाण्याची मागणी होत असत. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनाही काही प्रमाणात अतिरिक्त पाण्याची आवश्‍यकता भासते. लॉकडाउनमुळे सर्वच व्यवसाय बंद असल्याने धरणातील साठाही मुबलक राहिला. 

नाशिक : (जुने नाशिक) लॉकडाउनमध्ये खासगी टॅंकरने पाणीपुरवठा होण्याची मागणी सुमारे ९९ टक्क्यांनी घटली. दर वर्षी मार्च ते जून या चार महिन्यांच्या उन्हाळी हंगामात सरासरी ७२ कोटी लिटरचा पाणीपुरवठा खासगी टॅंकरने होता. यंदा लॉकडाउनमुळे टँकरद्वारे अवघ्या पाच लाख लिटरचा पाणीपुरवठा झाला. धरणात मुबलक साठा आणि लॉकडाउनमुळे हॉटेल ते कंपनीपर्यंतचे सर्व व्यवहार बंद असल्याने पाण्यासाठी टॅंकरची गरज भासलीच नाही. 

उद्योग-हॉटेल बंदचा पाणीविक्रीवर मोठा परिणाम 

शहरात अनेक ठिकाणी खासगी टॅंकरने पाणीपुरवठा केला जाततो. मायको सर्कल परिसरात चार वॉटर सप्लायर्स आहेत. चारही सफ्लार्य मिळून ३० टॅंकर आहेत. त्यातील २० टॅंकरचा विचार केला, तर मार्च ते जून अशा चार महिन्यांत एका टॅंकरच्या सरासरी दोन फेऱ्या होत. त्यात दहा लिटर पाणीपुरवठा केला जात. अर्थात, महिन्याकाठी एका टॅंकरच्या माध्यमातून सुमारे तीन लाख लिटर पाणीपुरवठा होत. त्यांच्या वीस टॅंकरचा विचार केला तर महिन्याकाठी ६० लाख लिटर पाण्याने चार महिन्यांत सुमारे ७२ कोटी लिटर पाणीपुरवठा होत असल्याची माहिती समोर आली. 

धरणातील पाणीसाठा मुबलक

यंदा याच चार महिन्यांत कोरोनामुळे सरकारकडून कडक लॉकडाउन ठेवण्यात आला होता. औद्यागिक क्षेत्र तर लहान-मोठे हॉटेलपर्यंत सर्वच व्यवसाय बंद होते. मार्च ते जूनदरम्यान विवाहाच्या तिथीही मोठ्या असतात. त्यामुळे हॉटेल, मंगल कार्यालय, लॉन्सकडून पाण्याची मागणी होत असत. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनाही काही प्रमाणात अतिरिक्त पाण्याची आवश्‍यकता भासते. लॉकडाउनमुळे सर्वच व्यवसाय बंद असल्याने धरणातील साठाही मुबलक राहिला. 

ग्रामीण भागात व्यवसाय ठप्प 

त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा यांसारख्या भागातील पाड्यांवरही टॅंकरला मागणी असते. पण गेल्या वर्षी पाऊस झाल्याने पाण्याचे टँकर सुरू नव्हते. परिणामी, खासगी टॅंकरची मागणी झाली नाही. दीड महिन्यापासून लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली. परंतु हॉटेल, लॉन्स, मंगल कार्यालये बंद होती. महिनाभरापासून ती उघडण्यास परवानगी दिल्याने सुमारे पाच लाख लिटर पाण्याचा पुरवठा झाला. ७२ कोटींच्या तुलनेत केवळ पाच टक्के पाणीपुरवठा म्हणजे काहीच नसल्याने पाण्याच्या टँकरचा व्यवसाय ठप्प पडला आहे. 

टँकरचे अर्थकारण 

एका टॅंकरच्या फेरीचे सुमारे ५०० रुपये दर आकारले जातात. एका टॅंकरला सरासरी दोन फेऱ्यांतून एक हजार रुपये मिळतात. महिन्यास ३० हजार मिळतात. अशा २० टॅंकरची उलाढाल लक्षात घेतली, तर सुमारे २४ लाखांची उलाढाल ठप्प झाली. विवाह, उद्योग, हॉटेल आणि अंत्यसंस्कारासाठी टॅंकरला मागणी असते. त्यामुळे सुमारे कोटीच्या घरात लॉकडाउनमुळे उलाढाल ठप्प होती. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश

लॉकडाउनमध्ये सर्व व्यवसाय बंद असल्याने हवी तशी पाण्याची मागणी झाली नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन देणे अवघड झाले होते. दैनदिन खर्चही निघत नाही. - नंदू जैन (श्रद्धा सेवा) 

उन्हाळी हंगामातच कडक लॉकडाउन असल्याने पाणीपुरवठा व्यवसायावर मोठा परिणाम झाला. सध्या लॉकडाउनमध्ये सूट देण्यात आली असली तरी अद्याप मागणी नसल्याने सेवा सुरळीत झालेली नाही. - सर्जेराव पवार (गजानन वॉटर सप्लायर्स)  

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Industry-hotel closure due to lockdown has major impact on water sales nashik marathi news