invention.jpg
invention.jpg

गाडीच्या वेगाने धावणारी सौरऊर्जेवरील सायकल?...'या' विद्यार्थ्यांचा भन्नाट आविष्कार...

नाशिक : (येवला) एखाद्या गाडीसोबत धावू शकणारी सायकल अन्‌ तीही कुठल्या इंधनाशिवाय, अशी कल्पनाच जगावेगळी वाटते. मात्र, येथील मातोश्री तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारी आगळीवेगळी सायकल बनविली असून, त्यांचा हा अविष्कार राज्यस्तरीय स्पर्धेत कौतुकाचा ठरला आहे.

अवघ्या आठ हजारांच्या खर्चात ही किमया साधली

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक मैल सायकलवर शाळेचा प्रवास करावा लागतो. शाळेचा प्रवास सुखकर करण्यासाठी धानोरा येथील मातोश्री तंत्रनिकेतच्या विद्यार्थ्यांनी सौरऊर्जेवर चालणारी सायकल बनवली आहे. मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी स्वप्नील वाबळे, राहुल खकाळे व दीपक ठोंबरे यांनी अवघ्या आठ हजारांच्या खर्चात ही किमया साधत आपल्यातील संशोधकाला चालना दिली. सायकलसाठी ड्रायलीड ऍसिड बॅटरी, रिले, एमसीबी, डीसी ब्रश टाईप मोटर, स्वीचेस, डिजिटल स्पिडोमीटर, मॅग्नेटिक सेन्सर, मिनिएचर सर्किट ब्रेकर हे उपकरण वापरण्यात आले. 

इंधनाचा भासणारा तुटवडा व वायू प्रदूषणाच्या समस्येला पूर्णपणे प्रतिबंध

ही सायकल इलेक्‍टरीक बॅटरीच्या साहाय्याने चालते. सूर्यप्रकाशाकडून मिळणारी नैसर्गिक ऊर्जा सोलर प्लेटच्या सहाय्याने बॅटरीमध्ये साठवली जाते. बॅटरीची ऊर्जा डीसी मोटरच्या साहायाने विशिष्ट गिअर प्रणालीला देऊन 270 आरपीएमच्या वेगाने सायकलला गती दिली जाते. एकदा चार्ज केल्यानंतर सायकल किमान 25 किलोमीटरपर्यंत वेगाने चालू शकते. बटनच्या साहाय्याने सायकल बॅटरी किंवा पुन्हा मूळ पॅडल मारण्याचा प्रक्रियेवर बदल केला जाऊ शकतो. रात्री प्रवास करण्यासाठी एलईडी लाईट तसेच स्पीड काऊटिंग करता स्पीडमीटर बसवलेले आहे. सायकलही पूर्णपणे पर्यावरणपूरक असून, इंधनाचा भासणारा तुटवडा व वायू प्रदूषणाच्या समस्येला पूर्णपणे प्रतिबंध घालणे शक्‍य होणार आहे.

विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सौरसायकलला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे- पाटील पॉलिटेक्‍निक, प्रवरानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय टेक्‍निकल स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत राज्यातील आठशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या विद्यार्थ्यांना प्रा. सीमा होन, प्रा. योगेश खैरनार, विभागप्रमुख प्रा. यशवंत हिरे यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक रूपेश दराडे, प्राचार्य गीतेश गुजराथी, प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, सुनील पवार यांनी अभिनंदन केले. 

सौरऊर्जेवरील सायकल पर्यावरणपूरक व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात चांगला पर्याय आहे. विद्यार्थी अंतिम वर्षाच्या प्रोजेक्‍टमध्ये कल्पकतेतून चांगले मॉडेल्स बनवितात. त्यातून चांगले उद्योजक बनण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतात. त्यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. - गीतेश गुजराथी, प्राचार्य, मातोश्री तंत्रनिकेतन  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com