
गुरुवारी (ता. १६) रात्री उशिरापर्यंत सोळा पथकांनी ३५ खासगी रुग्णालयांमध्ये पीपीई कीट घालून तपासणी केली. त्यात खासगी रुग्णालयांकडून अनियमितता होत असल्याचे निदर्शनास आल्याने या रुग्णालयांना कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
नाशिक : खासगी रुग्णालयांनी कोविड-१९ रुग्ण दाखल करताना महापालिकेच्या डॅशबोर्डवर माहिती अपडेट करण्याबरोबरच, उपचाराचे दर दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करण्यात आले. मात्र सूचनांचे पालन होत नसल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी रुग्णालयांमध्ये थेट भरारी पथक घुसविले. खासगी रुग्णालयांकडून अनियमितता होत असल्याचे निदर्शनास आल्याने या रुग्णालयांना कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
एकूण ३५ खासगी रुग्णालयांची पाहणी
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट सूरू आहे. शिवसेनेसह पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दखल घेत महापालिकेनेही रुग्णांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी डॅशबोर्डची निर्मिती केली. महापालिकेच्या संकेतस्थळावर असलेल्या डॅशबोर्डच्या माध्यमातून रुग्णालयांमध्ये किती खाटा आहेत, राखीव खाटा किती आहेत, व्हेंटिलेटर, दर व दाखल रुग्णांची माहिती मिळून पारदर्शकता निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु खासगी रुग्णालयांकडून यासंदर्भात कुठलीच दखल घेतली न गेल्याने अखेर थेट रुग्णालयात घुसून तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लेखा परीक्षक बी. जी. सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय विभागाचे अधिकारी, उपायुक्त व कर्मचाऱ्यांचे सोळा पथक तयार करून गुरुवारी रात्री उशिरा खासगी रुग्णालयांमध्ये पाठविले. अशोका मेडिकव्हर, वोक्हार्ट, सह्याद्री, सिक्स सिग्मा या मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांसह एकूण ३५ खासगी रुग्णालयांची पाहणी केली.
अशी झाली तपासणी
वैद्यकीय बाबी तपासण्यासाठी एक डॉक्टर, कागदपत्रे तपासणीसाठी लेखा विभागाच्या कर्मचाऱ्यांचा पथकामध्ये समावेश होता. पथकातील प्रत्येक व्यक्ती पीपीई कीट घालूनच रुग्णालयात गेला. वेळेवर उपलब्ध असलेले डॉक्टर, रेमडीसेवर औषधांची उपलब्धता, रुग्णाशी संवाद साधून दिल्या जाणाऱ्या सुविधा आदींची पाहणी केली. यात शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्याने रुग्णालयांना शासन निर्देश पाळण्याची एक संधी दिली जाणार आहे.
अशा आढळल्या अनियमितता
- उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांवर उपचार
- कोविड रुग्णांची माहिती महापालिकेला कळविली नाही
- व्हेंटिलेटरची संख्या अपुरी
- कोविड उपचारासाठी राखीव खाटांची माहिती महापालिकेला कळविली नाही
- रुग्णालयाच्या दर्शनी भागावर दरसूची न लावणे
हेही वाचा > वडील अंथरुणाला खिळलेले...मोलमजुरी करत विशालने बारावीत मिळवलं यश..वाचा फोटोमागच्या जिद्दीची कहाणी!
खासगी रुग्णालयासंदर्भात वाढत्या तक्रारी लक्षात घेता पथके तयार करून रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती प्राप्त झालेल्या माहितीची छाननी सुरू करून अनियमितता आढळलेल्या रुग्णालयांवर कारवाई करू. - राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका
हेही वाचा > आमदार फुटू नये म्हणून 'भाजप'कडून लॉलीपॉप...मिश्किल शैलीत भुजबळांची टीका