आयटीआय प्रवेशासाठी दुसरी निवड यादी शुक्रवारी; डिसेंबरमध्ये दिले जाणार प्रवेश

अरुण मलाणी
Monday, 30 November 2020

ही वाढीव मुदत संपल्‍यानंतर आता दुसऱ्या फेरीची प्रक्रिया पार पडेल. याअंतर्गत गुरूवारी (ता.३) सायंकाळी पाचला गुणवत्ता यादी संकेतस्‍थळावर प्रसिद्ध केली जाईल. यानंतर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्‍था व व्‍यवसायनिहाय निवड यादी शुक्रवारी (ता.४) सायंकाळी पाचला प्रसिद्ध केली जाणार आहे.

नाशिक : औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था (आयटीआय) मध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ प्रवेशासाठी सुधारीत वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जारी केले आहे. त्‍यानुसार दुसऱ्या फेरीसाठीची विद्यार्थ्यांची निवड यादी शुक्रवारी (ता.४) प्रसिद्ध केली जाणार आहे. एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज केलेल्‍या विद्यार्थ्यांना अर्जात दुरूस्‍ती करून खुल्‍या प्रवर्गातून प्रवेश अर्ज दिला जाणार आहे.

डिसेंबरमध्ये समुपदेशन फेरीद्वारे दिले जाणार प्रवेश

राज्‍य शासन स्‍तरावर प्रवेश प्रक्रिया राबविण्याला हिरवा कंदील दिल्‍यानंतर आयटीआय प्रवेशासाठी सुधारीत वेळापत्रक जारी केले होते. त्‍यानुसार विद्यार्थ्यांना नव्‍याने अर्ज सादर करणे, अर्जात दुरूस्‍ती व प्रवेश अर्ज शुल्‍क भरण्यासाठी सोमवार (ता.३०) पर्यंत मुदत दिलेली होती. ही वाढीव मुदत संपल्‍यानंतर आता दुसऱ्या फेरीची प्रक्रिया पार पडेल. याअंतर्गत गुरूवारी (ता.३) सायंकाळी पाचला गुणवत्ता यादी संकेतस्‍थळावर प्रसिद्ध केली जाईल. यानंतर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्‍था व व्‍यवसायनिहाय निवड यादी शुक्रवारी (ता.४) सायंकाळी पाचला प्रसिद्ध केली जाणार आहे.

तेव्हा प्रत्‍यक्ष उपस्‍थित राहून प्रवेशाची प्रक्रिया

दुसऱ्या यादीत निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना सर्व मुळ प्रमाणपत्रांच्‍या पडताळणीसाठी उपस्‍थित राहून प्रत्‍यक्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्‍यासाठी ५ ते ८ डिसेंबरपर्यंत मुदत असेल. विद्यार्थ्यांना पहिल्‍या तीन विकल्‍पांपैकी कोणत्‍याही एका विकल्‍पानुसार जागा मिळाल्‍यास प्रवेश निश्‍चित करावा लागेल. प्रवेश निश्‍चित न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्‍या तिसऱ्या, चौथ्या फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी ऑनलाइन पद्धतीने व्‍यवसाय व संस्‍थानिहाय विकल्‍प व प्राधान्‍य सादर करण्याची मुदत ५ ते ८ डिसेंबरपर्यंत असेल.

प्राधान्‍य सादर करण्यासाठी १२ ते १५ डिसेंबरपर्यंत मुदत

तिसऱ्या फेरीची निवड यादी ११ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल. यादीत नावे असलेल्‍या विद्यार्थ्यांना १२ ते १५ डिसेंबरदरम्‍यान प्रवेश निश्‍चित करावे लागतील. या फेरीत पहिल्‍या पाच विकल्‍पांपैकी कुठल्‍याही व्‍यवसाय, संस्‍थेत नाव आल्‍यास संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागेल. चौथ्या फेरीसाठी ऑनलाइन पद्धतीने व्‍यवसाय व संस्‍थानिहाय विकल्‍प व प्राधान्‍य सादर करण्यासाठी १२ ते १५ डिसेंबरपर्यंत मुदत असेल. या फेरीची निवड यादी १८ डिसेंबरला जाहीर केली जाईल. या फेरीतील सहभागी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्‍या पसंतीक्रमाच्‍या कुठल्‍याही एका विकल्‍पानुसार जागा मिळाल्‍यास प्रवेश निश्‍चित करावा लागेल. त्‍यासाठी १९ ते २२ डिसेंबरदरम्‍यान मुदत असेल.

समुपदेशन फेरीसाठी उद्यापासून अर्ज प्रक्रिया

यापूर्वीच्‍या मुदतीत अर्ज करू न शकलेल्‍या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीत सहभागी होता येईल. समुपदेशन फेरीसाठी ऑनलाइन अर्ज करणे, अर्जात दुरूस्‍ती, प्रवेश अर्ज शुल्‍क भरण्याची मुदत उद्या (ता.१) पासून २० डिसेंबरपर्यंत असेल. समुपदेशन फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी २४ डिसेंबरला प्रसिद्ध होईल. सर्व शासकीय, खासगी आयटीआयमध्ये चौथ्या फेरीनंतर रिक्‍त जागांकरीता जिल्‍हास्‍तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्‍ध जागांचा तपशील याच दिवशी जारी केला जाईल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For ITI admission second selection list is Friday nashik marathi news