९४ व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर; नाशिकमध्ये २६ ते २८ मार्चला संमेलन   

Jayant Naralikar
Jayant Naralikar

नाशिक : देशाचे खगोलशास्त्रज्ञ अन्‌ विज्ञानकथा लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची नाशिकमधील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. बालाजी लॉन्समध्ये संमेलनाध्यक्षपदासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि घटक व संलग्न संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत तासभर खल झाला. त्यानंतर संमेलनस्थळी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील संमेलन कार्यालयात सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी संमेलनाध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली. 

संमेलनाच्या इतिहास पहिल्यांदाच खगोलशास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञान लेखकाला अध्यक्षपद मिळाले आहे. नाशिकमध्ये दीड दशकानंतर होत असलेले साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चला होत आहे, असेही ठाले-पाटील यांनी जाहीर केले. महामंडळाचे उपाध्यक्ष कपूर वासनिक (छत्तीसगड), कार्यवाह डॉ. दादा गोरे, खजिनदार डॉ. रामचंद्र काळुंखे, नागपूरचे विलास मानेकर, भोपाळचे पुरुषोत्तम सप्रे, गुलबर्गाचे भालचंद्र शिंदे, निमंत्रक तथा लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, दिलीप साळवेकर, प्रा. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. दरम्यान, महामंडळ आणि संलग्न संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीसाठी या सर्वांसह पुण्याचे मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, मुंबईच्या प्राचार्या उषा तांबे, उज्वला मेहंदळे, वर्धाचे प्रदीप दाते, विदर्भचे गजानन नारे, बडोद्याचे प्रसाद देशपांडे, मावळते संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो उपस्थित होते. श्री. ठाले-पाटील म्हणाले, की संमेलनाध्यक्षपदाची निवड एकमताने होऊ शकली नाही. डॉ. नारळीकर, भारत सासणे, प्राचार्य डॉ. जर्नादन वाघमारे, विज्ञान कथालेखक डॉ. बाळ फोंडके, डॉ. रामचंद्र देखणे, नाशिकचे मनोहर शहाणे अशा सहा नावांवर संमेलनाध्यक्षपदासाठी विचारविनिमय झाला. संमेलनाध्यक्षपदाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या प्रश्‍नासंबंधी चर्चा झाली. त्यातून बहुमताने संमेलनाध्यक्षांची निवड झाली. 

डॉ. नारळीकर तीनही दिवस राहतील उपस्थित 

संमेलनाध्यक्ष ऑनलाइन संवाद साधतील, ते संमेलनासाठी उपस्थित राहणार नाहीत हे खरे आहे काय? या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. ठाले-पाटील म्हणाले, की डॉ. नारळीकर यांच्या अनुषंगाने पत्नी मंगलाताई यांच्या पत्रातील दोन कोट अडचणीचे होते. त्यावर बरीच चर्चा झाल्याने निवड प्रक्रियेला वेळ लागला. संमेलनाध्यक्षांनी तीनही दिवस उपस्थित राहणे आवश्‍यक आहे, साहित्यिक-रसिकांमध्ये मिसळावे, अशी भूमिका बैठकीत मांडली गेली. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने डॉ. नारळीकर यांच्या सहीचे संमतीपत्र दिले आहे. त्यामुळे ते तीन दिवस संमेलनासाठी उपस्थित राहतील. 

संमेलनाची कार्यक्रम पत्रिका निश्‍चित 

महामंडळाच्या बैठकीत उपसमितीने साहित्य संमेलनाची तीन दिवसांच्या उपक्रमांची रूपरेषा तयार केली. ती बैठकीत ठेवण्यात आली. त्यात किरकोळ फेरबदल करून रूपरेषा मान्य करण्यात आली आहे. त्याविषयी ठाले-पाटील म्हणाले, की निमंत्रित लेखक, कवी, वक्ते आणि कलावंतांची निवड करण्यात आली आहे. पंधरा दिवसांनंतर दोन टप्प्यांत संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली जाईल. जुन्या आणि नव्या पद्धतीचे, प्रयोग व प्रथा-परंपरांचे मिश्रण कार्यक्रम पत्रिकेत असेल. सहा परिसंवाद असतील. निमंत्रित कवींचे कवितांचे सादरीकरण होईपर्यंत तीन ते साडेतीन तास कविसंमेलन होईल. कथाकथनाचा एक कार्यक्रम असेल. अभिजात वाङ्‌मयविषयक दोन उपक्रम असतील. ब्रिटिशांनंतर गद्य लेखनाची परंपरा सुरू झाली. त्यास दर्जा आणि स्थान प्राप्त झाले आहे. ते कधीही कमी होणार नाही. आजच्या जगण्याशी त्याचे संदर्भ आहेत. ते अजूनही ताजे व टवटवीत आहे. त्यातून वाङ्‌मयाचे अभ्यासक खूश होतील. याशिवाय बालसाहित्यिकाचे उपक्रम संमेलनात असतील. पण विज्ञान कथालेखक संमेलनाध्यक्ष झाले असल्याने या विषयासाठी वेगळ्या उपक्रमाची गरज भासलेली नाही. 

नाशिकशी संमेलन जोडत शहाणेंचा होणार सन्मान 

संमेलनातील उपक्रमांचा नाशिकशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असे सांगून श्री. ठाले-पाटील यांनी काही दाखले दिले. ते म्हणाले, की ब्रिटिशांनी देशातील पहिले वाचनालय कोलकत्यात, तर दुसरे नाशिकमध्ये सुरू केले. ब्रिटिशांनंतर ही वाचनालये भारतीयांची झालीत. ब्रिटिश महिला फेरार हिने मराठीतून लेखन केले आहे. नाशिकचे वाचनालय हे भूषणावह आहे. तसेच खानदेशची कुलदैवत सप्तशृंगीदेवीच्या गडाच्या पायथ्याजवळ मोगलांच्या एक लाख सैन्याच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी चाळीस हजार सैन्याशी समोरासमोर लढा दिला. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी विजय मिळवला. ‘असे झुंजले श्रंगीरीचे रण' यातून लढाई आपण जिंकू शकतो, असा आत्मविश्‍वास मराठी जणांमध्ये तयार झाला. याशिवाय नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेला १५१ वर्षे होताहेत. त्यानिमित्त वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांची सुरवात संमेलनातून होणार आहे. जिल्ह्यातील कर्तबगार स्त्री-पुरुषांचा सहभाग असलेल्यांची दोन तासांची चर्चा या अनुषंगाने होईल. त्याचप्रमाणे संमेलनाध्यक्षपदासाठी प्रस्ताव देण्यात आलेले गंभीर प्रकृतीचे लेखक मनोहर शहाणे यांचा सन्मान संमेलनाध्यक्ष डॉ. नारळीकर यांच्या हस्ते होईल. श्री. शहाणे यांचे ज्येष्ठत्व आणि लेखनाचा दर्जा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, श्री. शहाणे सन्मानाला उत्तर देतील. 

संमेलन उद्‌घाटक लेखक अथवा लेखिका 

संमेलनाच्या उद्‌घाटनासाठी राजकीय नेत्यांना बोलवणार काय? या प्रश्‍नावर ठाले-पाटील म्हणाले, की राजकीय व्यक्तींना साहित्य संमेलन वर्ज्य नाही. त्यांनाही साहित्याबद्दल आस्था आहे. ते रसिक आहेत. ते संमेलनाला येऊ शकतात. सहभागी होऊ शकतात. पण, मराठीमध्ये मान्यवर लेखक आहेत. त्यांच्या हातून उद्‌घाटन करण्यास गेल्या वर्षीपासून सुरवात झाली आहे. त्याप्रमाणे नाशिकमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन लेखक अथवा लेखिकांच्या हस्ते होईल. याशिवाय कोणत्याही नेत्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याबद्दलची मला माहिती नाही. तसे कुणीही सुचवले तरीही मान्य केले जाणार नाही. संमेलनात विनाभूमिकेचे कोणीही असणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com