JEE Advance 2020 : जिल्‍ह्‍यात ११ केंद्रांवर उद्या होणार परीक्षा; पाच हजार विद्यार्थी प्रविष्ठ

अरुण मलाणी
Saturday, 26 September 2020

त्‍यानुसार केंद्रांवर विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवले जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या प्रवेश पत्रावर नमूद बारकोड परीक्षा केंद्रांवर स्कॅन केल्‍यानंतर वर्ग व अन्‍य तपशील उपलब्‍ध करून दिला जाईल. प्रवेशपत्रावर नमूद असलेल्‍या वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्‍थित राहाणे बंधनकारक असेल.

नाशिक : राष्ट्रीय स्‍तरावरील इन्‍स्‍टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्‍सच्‍या माध्यमातून पात्रता मिळविलेल्‍या विद्यार्थ्यांची पुढील टप्‍यात जेईई ॲडव्हान्स २०२० परीक्षा उद्या (ता. २७) देशभरात पार पडणार आहे. नाशिकमध्ये अकरा परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेसाठी सुमारे पाच हजार विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत. परीक्षा आयोजन करत असलेल्‍या दिल्‍ली आयआयटीतर्फे परीक्षेच्‍या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. परीक्षेचा निकाल ५ ऑक्‍टोबरला जारी केला जाईल. 

जिल्‍ह्‍यात ११ केंद्रांवर परिक्षा

जेईई ॲडव्हान्स परीक्षेच्‍या गुणांवर इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. सध्याच्‍या कोरोनाच्‍या परिस्‍थितीत परीक्षा केद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्‍यानुसार नाशिकमध्ये अकरा केंद्रांवर ही परीक्षा होते आहे. सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत पेपर क्रमांक एक पार पडेल. तर दुपारी अडीच ते साडे पाच या दरम्‍यान पेपर क्रमांक दोन घेतला जाणार आहे. दरम्‍यान कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता परीक्षा आयोजना बाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहे. त्‍यानुसार केंद्रांवर विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवले जाणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या प्रवेश पत्रावर नमूद बारकोड परीक्षा केंद्रांवर स्कॅन केल्‍यानंतर वर्ग व अन्‍य तपशील उपलब्‍ध करून दिला जाईल. प्रवेशपत्रावर नमूद असलेल्‍या वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्‍थित राहाणे बंधनकारक असेल. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

प्रवेशपत्रावर द्यावा लागेल 
आरोग्‍यविषयक तपशील 

आरोग्‍यविषयक माहिती प्रवेशपत्रावर नमूद करावी लागणार असून, परीक्षा संपल्‍यानंतर प्रवेशपत्र केंद्रात जमा करावे लागणार आहे. याशिवाय परीक्षा केंद्रावर ठिकठिकाणी सॅनिटायझर उपलब्‍ध करून दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी स्‍वतःचा मास्‍क व पारदर्शक सॅनिटायझरची बाटली आणण्यास परवानगी आहे. प्रश्‍न सोडविण्यासाठी कच्चा कागद परीक्षा केंद्रावर उपलब्‍ध करून दिला जाणार असून, अतिरिक्‍त कच्चा कागद मात्र दिला जाणार नसल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JEE Advance exam on 27th September nashik marathi news