"भौतिकशास्‍त्र, रसायनशास्त्राच्या ‌प्रश्‍नांनी फोडला घाम" जेईई परीक्षेवेळी विद्यार्थ्याच्या प्रतिक्रिया

अरुण मलाणी
Monday, 28 September 2020

सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत पेपर क्रमांक एक घेण्यात आला. दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच या वेळेत पेपर क्रमांक दोन घेण्यात आला. दोन्‍ही पेपरच्‍या मधल्‍या काळात विद्यार्थ्यांना जेवणासाठी बाहेर सोडण्यात आले होते.

नाशिक : राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी इन्‍स्‍टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी रविवारी (ता. २७) जेईई ॲडव्हान्स्‍ड परीक्षा देशभरात पार पडली. ऑनलाइन स्‍वरूपात झालेल्‍या या परीक्षेत भौतिकशास्‍त्र आणि रसायनशास्‍त्र विषयाच्‍या प्रश्‍नांची काठिण्य पातळी अधिक असल्‍याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. सुमारे ९० टक्‍के विद्यार्थ्यांची परीक्षेला उपस्‍थिती राहिली. सध्याच्‍या वेळापत्रकानुसार ५ ऑक्‍टोबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. 

५ ऑक्‍टोबरला निकाल जाहीर होणार
इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) व यांसारख्या राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी जॉइंट एंट्रन्‍स एक्‍झाम (जेईई) ॲडव्हान्स्‍ड ही परीक्षा घेण्यात आली. तत्‍पूर्वी जेईई मेन्‍स परीक्षा घेण्यात आली होती. जानेवारी व सप्‍टेंबर महिन्‍यात घेतलेल्‍या जेईई मेन्‍स परीक्षांतून पात्रता मिळविलेल्‍या विद्यार्थ्यांनी रविवारी (ता. २७) जेईई अॅडव्हान्स्‍ड परीक्षा दिली. नाशिक शहरातील विविध केंद्रांवर एक हजार २८३ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. यांपैकी एक हजार १५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत पेपर क्रमांक एक घेण्यात आला. दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाच या वेळेत पेपर क्रमांक दोन घेण्यात आला. दोन्‍ही पेपरच्‍या मधल्‍या काळात विद्यार्थ्यांना जेवणासाठी बाहेर सोडण्यात आले होते. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना 
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, परीक्षा केंद्रावर विशेष काळजी घेण्यात आली. विद्यार्थ्यांना स्‍वतः मास्‍क आणण्याच्‍या सूचना केलेल्‍या होत्‍या. केंद्रांवर सॅनिटायझर उपलब्‍ध करून दिले होते. तसेच विद्यार्थ्यांना स्‍वतःचे सॅनिटायझर आणण्याचा विकल्‍प उपलब्‍ध होता. गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेशासाठी वेगवेगळी वेळ दिलेली होती. तसेच वर्ग व अन्‍य तपशिलाची माहिती प्रवेशपत्रावरील बारकोड स्‍कॅन केल्‍यानंतर विद्यार्थ्यांना मिळाली. आरोग्याविषयीचे हमीपत्र विद्यार्थ्यांनी त्‍यांच्‍या प्रवेशपत्रावर नमूद केलेले होते. 

 हेही वाचा >  तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

विद्यार्थी म्‍हणाले... 

भौतिकशास्‍त्र विषयाचे प्रश्‍न कठीण वाटले. परीक्षा केंद्रावरील सुविधा व्‍यवस्‍थित होती. आम्‍ही विद्यार्थ्यांनीदेखील कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना व काळजी घेतली. परीक्षा झाल्‍याने दडपण कमी झाल्यासारखे वाटते. -अनुज गवळी 

जेईई ॲडव्हान्स्‍ड परीक्षेची प्रतीक्षा होती. खरेतर मी नीट परीक्षेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलेले होते. परीक्षेसाठी पात्र ठरल्‍याने आज परीक्षा दिली. भौतिकशास्‍त्र आणि रसायनशास्‍त्र विषयाच्‍या प्रश्‍नांची काठिण्य पातळी अधिक राहिली. -ओंकार सदगीर  

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JEE Advanced Examination Ninety percent attendance of students nashik marathi news