नाशिक-मुंबई प्रवास होणार आणखी जलद; खासदारांनी दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

मुंबईहून ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने या महामार्गावर कायम वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. याची दखल घेत पिंप्रीसदो ते गोंदेदरम्यान महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी खासदार गोडसे प्रयत्नशील होते.

इगतपुरी (नाशिक) : तालुक्यातील पिंप्रीसदो शिवारातील समृद्धी महामार्ग ते-गोंदेदरम्यानच्या चारपदरी महामार्गाचे रुंदीकरण करून हा रस्ता सहापदरी करण्याला केंद्रीय सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने (नॅशनल ऑथरिटी ऑफ इंडिया) मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. 

प्रवासाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार

इगतपुरी शिवारात पिंप्रीसदो ते गोंदे औद्योगिक वसाहतीदरम्यान हा महत्त्वाचा रस्ता आहे. पिंप्रीसदो येथील समृद्धी महामार्ग ते मुंबई-आग्रामहामार्गादरम्यान गोंदे येथे वाहतूक कोंडीचा विषय मार्गी लागून नाशिक-मुंबई या प्रवासाचा कालावधी कमी होण्यास मदत होणार तर आहेच, शिवाय नाशिक-मुंबई प्रवासाची वेळही घटणार आहे. पिंप्रीसदो शिवारातून समृद्धी महामार्ग जात आहे. सध्या पिंप्रीसदो ते गोंदेदरम्यान चारपदरी महामार्ग आहे. मुंबईहून ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने या महामार्गावर कायम वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. याची दखल घेत पिंप्रीसदो ते गोंदेदरम्यान महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी खासदार गोडसे प्रयत्नशील होते. अखेर या मार्गाला केंद्राने सहा पदरीकरणास मान्यता दिली आहे. केंद्रीय परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाचे (नॅशनल ऑथरिटी ऑफ इंडिया) मुख्य जनरल मॅनेजर आशिष असाटी यांनी खासदार गोडसे यांना पत्र दिले. 

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

२० किलोमीटरचे सहापदरीकरण 

वडपे ते गोंदेदरम्यान सुमारे ९० किलोमीटरचा महामार्ग असून, त्यापैकी पिंप्रीसदो ते गोंदे हा २० वीस किलोमीटरचा चारपदरी महामार्ग लवकरच सहापदरी होणार आहे. याकामी सुमारे दोनशे ते अडीचशे कोटी रुपये खर्च येणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पिंप्रीसदो ते गोंदे यादरम्यानच्या सहापदरी महामार्गामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघून नाशिक-मुंबई प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे. 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: journey from Nashik to Mumbai will be even less nashik marathi news