कळवण, सुरगाण्यातील मान्यताप्राप्त प्रकल्प मार्गी लावू - दत्तात्रय भरणे

रविंद्र पगार
Saturday, 17 October 2020

श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कळवण-सुरगाणा तालुक्यांतील साठवण तलाव व को.प. बंधारे या योजनांबाबत आमदार नितीन पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. 

नाशिक : (कळवण) कळवण-सुरगाणा तालुक्यांतील लघु पाटबंधारे योजनेतील सतखांब, वांगण आणि लाडगाव या प्रशासकीय मान्यताप्राप्त झालेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेऊन प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. 

३.५० एमसीएफटी पाण्याचे नियोजन

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी क्षेत्राच्या सिंचन विकासाकरिता निधी उपलब्ध करून प्रथम प्राधान्याने लपा तलाव सतखांब, वांगण व इतर लघु प्रकल्प मार्गी लावावे. सद्यःस्थितीत सुरगाणा तालुक्यातील लपा योजना राबविताना ३.५० एमसीएफटी पाण्याचे नियोजन आहे, ते वाढीव करून सुरगाणा तालुक्यासाठी किमान ५ एमसीएफटी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार नितीन पवार यांनी केली. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री श्री. भरणे यांच्याबरोबर आमदार नितीन पवार यांची मंत्रालयात बैठक झाली. या वेळी कळवण-सुरगाणा तालुक्यांतील लघु पाटबंधारे योजनेतील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या प्रकल्पांसाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी प्राप्त व्हावा, यासाठी आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जलसंधारण आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव यांची संयुक्त बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेणार असल्याचे माहिती या वेळी श्री. भरणे यांनी दिली. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!

विविध विषयांवर चर्चा 

तालुक्यातील उर्वरित १० लघु पाटबंधारे प्रकल्पांचे अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश श्री. भरणे यांनी संबंधित यंत्रणेला दिले. संबंधित बैठकीत सुरगाणा तालुक्यातील गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लघु पाटबंधारे योजना, पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे इत्यादी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस आमदार नितीन पवार, प्रधान सचिव नंदकुमार, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी व्ही. देवराज, जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक वि. क. नाथ, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रवीण खेडकर, चिंतामण गावित, गोपाळराव धूम, राजू पवार, आनंद झिरवाळ, नवसू गायकवाड, काशीनाथ वाघमारे, युवराज लोखंडे, राकेश दळवी आदी उपस्थित होते. 

हेही वाचा >  दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalwan, get the approved project in Surganya sorted out nashik marathi news