#Lockdown : व्यवसाय बंद असूनही त्याची चिंता न करता, 'ते' देताय भुकेल्या वाटसरूसह गावकऱ्यांसाठी १२ तास गरमागरम जेवण!

कापसे फाऊंडेशन.jpg
कापसे फाऊंडेशन.jpg

नाशिक : (येवला) कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेकांचा रोजगार हिसकावला असून, येथील पैठणी व्यावसायिकांचे रोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याची चिंता अनेकांना पडली; पण येथील कापसे पैठणीच्या संचालकांना मात्र चिंता आहे ती भुकेल्यांची..! व्यवसाय बंद असूनही त्याची चिंता न करता कापसे फाउंडेशनने येवला ते नांदगाव महामार्गावरून जाणाऱ्या वाटसरूंसह आजूबाजूच्या चार-पाच गावांतील हातावर प्रपंच असलेल्या गरजू भुकेल्यांना चार घास मिळावे, याची सोय केली आहे. त्यासाठी त्यांनी वडगाव येथे सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत तब्बल 12 तास जेवणाची व्यवस्था केली असून, 300 ते 400 भुकेले येथे तृप्त होत आहेत. 

300 ते 400 भुकेले येथे तृप्त होताय
 
कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे व दिलीप खोकले यांचे या उपक्रमामुळे कौतुक होत आहे. येवला- नांदगाव- चाळीसगाव राज्य महामार्गावरून कोरोनामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव, रावेर आदी जळगाव जिल्ह्यातील तालुक्‍यांकडे हा मार्ग सोयीचा असल्याने जथेच्या जथे जात आहेत. त्यांना अन्न-पाण्याचा मोठा प्रश्‍न भेडसावत आहे. तसेच वडगाव, मातुलठाण, नागडे, बलेगाव आदी गाव परिसरातील मजुरांसह विणकर, आदिवासी, गोरगरीब कुटुंबांना पोटाच्या खळगीचा प्रश्‍न निर्माण झाला होता. हे समजताच कापसे यांनी भोजनाची व्यवस्था आपल्या जागेत उपलब्ध करून दिली. संपूर्ण दिवसभर गरमागरम एक भाजी, चपाती, वरण-भात, ठेचा, कांदा, लिंबू असे जेवण देत आहेत. 

प्रथम हात सॅनिटायझरने धुण्याची व्यवस्था

कोरोनाच्या साथीमुळे भोजनासाठी प्रत्येक नागरिकाचे बैठक अंतर तीन ते चार फुटांचे ठेवले असून, सर्वांचे हात प्रथम सॅनिटायझरने धुण्याची व्यवस्था केली आहे. तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलिस निरीक्षक संदीप कोळी, नायब तहसीलदार प्रकाश वुरुंगळे, नामदेवराव कापसे, सरपंच मीरा कापसे, कापसे पैठणी उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब कापसे, दिलीप खोकले, सुनीता खोकले यांच्या हस्ते या अन्नदानाची सुरवात केली. भाऊसाहेब कापसे, वंदना कापसे, बाळासाहेब वाल्हेकर, दत्तात्रय कापसे, जितेश पगारे, नितीन संसारे, सुभाष सोमासे, रवी जमधडे, दादाभाऊ जाधव, प्रशांत संसारे, सोपान मोरे, अनिल मोरे आदी नियोजन करत आहेत. 

अशा अडचणीच्या काळात गरजूंना मदत करायला पाहिजे, या सामाजिकतेतून आम्ही गरीब-गरजूंची भूक भागवत आहोत. देशात लॉकडाउनची परिस्थिती असेपर्यंत गोरगरीब व वाटसरूंना मोफत भोजन देण्याचा मानस आहे. - बाळासाहेब कापसे, संस्थापक, पैठणी उद्योग समूह 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com