खडसे भाजप परिणाम : नाशिकमध्ये भाजपची तटबंदी तूर्त भक्कम!

विक्रांत मते
Thursday, 22 October 2020

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतात का, याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले असले तरी उत्तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या नाशिक जिल्ह्यात मात्र तूर्त भाजपच्या गडाची तटबंदी भक्कम असल्याचे दिसून आले.

नाशिक : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतात का, याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले असले तरी उत्तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या नाशिक जिल्ह्यात मात्र तूर्त भाजपच्या गडाची तटबंदी भक्कम असल्याचे दिसून आले. महापालिकेसह केंद्रातील सत्तेमुळे तूर्त कुठलाही धोका नको म्हणून समर्थकांनी भूमिका घेतली; परंतु चौदा महिन्यांनंतर होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत मात्र त्याचे परिणाम दिसून येणार असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. 

नाशिकमध्ये भाजपची तटबंदी तूर्त भक्कम 
गेल्या अनेक महिन्यांपासून खडसे भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज समाजमाध्यमांतून दिलेला होकार व श्री. खडसे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांच्या सोबत कोण जाणार, यावर आज दिवसभर शहरात चर्चा सुरू होती. विशेष करून नाशिक महापालिकेतील काही नगरसेवक खडसे यांच्या बाजूने उभे राहतील, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु तूर्त भाजपची नाशिकमधील तटबंदी भक्कम असल्याचे दिसून आले. 

भविष्याची चिंता 
केंद्रात भाजपची असलेली सत्ता, राज्यात सक्षम विरोधी पक्ष व महापालिकेत सत्ता असल्याने तूर्त नाशिकमध्ये भाजपचा एकही नगरसेवक पक्षाविरोधात भूमिका घेणार नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. खानदेश भागातील मतांचा प्रभाव असलेल्या सिडको भागात खडसे समर्थक तीन ते चार नगरसेवक आहेत. परंतु महापालिकेत सत्ता असल्याने व आगामी निवडणुकांना अद्याप चौदा महिने शिल्लक असल्याने तूर्त बंडखोरी केली जाणार नाही. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यादेखील भाजपमध्येच असल्याने आताच कुठलीही हालचाल नको, अशी भूमिका घेण्यात आली आहे. पालिकेत माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक १२ ते १५ नगरसेवक आहेत. त्यांनीदेखील पक्षाविरोधात अद्याप भूमिका घेतली नाही. त्यामुळे तूर्त खडसेंच्या मागे जाणे परवडणारे नसल्याचे मानले जात असल्याचे समजते.

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

डॅमेज कन्ट्रोलची भाजपमध्ये कुठलीच शक्यता नाही

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर काय होऊ शकते, याची चाचपणी करताना काही आजी-माजी आमदारांवर मात्र पक्षाच्या नेत्यांकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. परंतु, जशा निवडणुका जवळ येतील त्या वेळी मात्र खडसे समर्थक नगरसेवक उघड भूमिका घेण्याची शक्यता असल्याने भाजपला आजची नसली तरी उद्याची मात्र चिंता आहे. जिल्हा परिषद सदस्यांमध्ये सर्वच सदस्य माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रभावाखाली असल्याने ग्रामीण भागात डॅमेज कन्ट्रोलची भाजपमध्ये कुठलीच शक्यता नाही. 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्याचे दुख असले तरी त्यांच्या पाठोपाठ कोणी पक्ष सोडणार नाही. एवढेच काय, त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यादेखील भाजप सोडणार नाहीत. त्यामुळे पक्ष यापूर्वीही भक्कम व सुस्थितीत होता व भविष्यातही राहील. -गिरीष पालवे, शहराध्यक्ष, भाजप  

 संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khadse BJP result BJP strong in Nashik marathi news