येवल्यात ‘ढिल दे, ढिल दे दे रे भय्या’ची धमाल यंदाही; पतंगोत्सवासाठी बाजारपेठ सजली

संतोष विंचू 
Monday, 11 January 2021

निळ्याशार आकाशात गारवा असलेले ऊन...गर्दीने फुललेली घरांची अन्‌ सप्तरंगी पतंगांनी सजलेले गगन सजून असे नजरेत साठवावे वाटणारे सुनामीसदृश्य दृश्य पतंगनगरीत कर, मकरसंक्रांत आणि भोगी या तीन दिवसांत दिसणार आहे. अहमदाबाद-सुरतेचे भावंड असलेल्या पैठणीच्या या शहराला पतंगोत्सवाचे वेध लागल्याचे चित्र गल्लोगल्ली दिसत असून, विक्रेते अन्‌ शौकिनांची लगबग सुरू आहे.

येवला (जि. नाशिक) : निळ्याशार आकाशात गारवा असलेले ऊन...गर्दीने फुललेली घरांची अन्‌ सप्तरंगी पतंगांनी सजलेले गगन सजून असे नजरेत साठवावे वाटणारे सुनामीसदृश्य दृश्य पतंगनगरीत कर, मकरसंक्रांत आणि भोगी या तीन दिवसांत दिसणार आहे. अहमदाबाद-सुरतेचे भावंड असलेल्या पैठणीच्या या शहराला पतंगोत्सवाचे वेध लागल्याचे चित्र गल्लोगल्ली दिसत असून, विक्रेते अन्‌ शौकिनांची लगबग सुरू आहे. ‘गो कोरोना’चे संदेश देणारे पतंग बाजारात विक्रीला आले असून, यंदा पतंग व आसारीच्या दरात वाढ झाली आहे. 

कोरोनाला विसरुन तयारी जोरात...

गुजरातमधील अहमदाबादनंतर पतंगबाजी करण्यात देशातील दुसरा क्रमांक व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक असलेले शहर म्हणजे येवला शहर. मकरसंक्रांतीच्या भोगी, कर व संक्रांत असे अगदी तीनही दिवस तहानभूक विसरून केवळ पतंग अन् पतंगातच रममाण होणारे येथील पतंगबाज कोरोना विसरून आनंद लुटण्यासाठी खरेदीला लागले आहेत. अस्सल येवला मेड आसारी व या आसारीवरील सुतविल्या गेलेल्या मांजानिशी हवेत उंच उंच जात आकाशात इकडून तिकडे गिरक्या घेणारे रंगबेरंगी पतंग... ‘दे ढिल, अरे दे देरे ढिल भय्या’ अशी धमाल यंदाही दिसणार आहे. 

पाहुण्यांना निमंत्रणे गेली..

या उत्सवाला येथेच तयार झालेले पतंग, आसारी व मांजा दोरा वापरला जातो. येथील पतंगवेडे आसारी, पतंग खरेदीपासून मांजा बनविण्याच्या कामाला लागले आहेत. सोडावॉटरच्या काचेच्या बाटल्यांचा अतिशय बारीक भुगा करून हा भुगा, चरस, रंग याद्वारे मांजा तयार केला जातो. येथील बाजारपेठेत विक्रेत्यांच्या दुकानांत सर्वत्र पतंग, दोरा, मांजा, आसारी खरेदीसाठी तसेच घरगुती मांजा बनविण्यासाठी एकच लगबग सुरू आहे. शहरातील आसारी व पतंगाची दुकाने थाटली गेली आहेत. पतंग, मांजा, आसारीची खरेदी सुरू आहे. पण गच्ची स्वच्छ करण्यासह डीजेचे बुकिंग, मित्रांची जमवाजमव अन्‌ पाहुण्यांना येथे येण्याचे निमंत्रणही दिले जात आहे. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

शहरात पतंग बनविणारे सुमारे पंधरा, विक्री करणारे २० ते २५, तसेच आसारी बनविणारे १० ते १५ कारागीर आहेत. प्रत्येक शौकिन एक-दोन पतंग न घेता ५० ते २०० पतंग एकाचवेळी खरेदी करतात. मोठे कुटुंबीय तर पाचशेपर्यंत पतंग खरेदी करतात. दोरा, त्याचे साहित्य व इतर खरेदीचे प्रमाणही मोठे असते. या सर्व खरेदी-विक्रीतून २०-२५ लाखांच्या उलाढालीचा लाभ शहराच्या अर्थकारणाला नक्कीच होत आहे. 

*असे आहेत दर... 
- आठपाती आसारी मांजासह : ४०० रुपये 
- सहापाती आसरी मांजासह : ३०० रुपये 
- सहापाती छोटी आसारी : ५० ते १२० रुपये 
- आठपाती मोठी आसारी : १६०,२५० रुपये 
- जंबो साईज आसारी : ३५० रुपये 
- दहापाती जंबो आसारी : ४५० ते ५०० रुपये 
- लोखंडी आसारी : छोटी १९०, मध्यम ३००, तर मोठी ३६० रुपये 

*पतंग शेकडा भाव 
-तीनचा पतंग : ३०० रुपये 
-अर्धीचा : बिगर गोठवाला : ५०० रुपये 
-अर्धीचा गोठवाला : ६०० रुपये 
-पाऊणचा पतंग : १० व १२ रुपये नग 
-सव्वाचा पतंग : २५ व ३० रुपये नग 

येथील शौकिनांकडून पतंगोत्स्वासाठी आसारीला मोठी मागणी असून, परजिल्ह्यातूनही मागणी वाढत आहे. आसारीसाठी लागणाऱ्या बांबूचे भाव वाढले आहेत. रत्नागिरी, राजापूर येथून बांबू मागविले जातात. बांबूचे भाव वाढल्यामुळे नाइलाजास्तव आम्हाला १० ते ४० रुपयांपर्यंत वाढ करावी लागली आहे. मात्र मागणी नेहमीप्रमाणेच आहे. 
- सचिन खैरे, आसारी कारागीर, येवला  

 

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kites have come to the market in Yeola for sale nashik marathi news